"मोदींच्या कानमंत्रावर चालताहेत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल"

मुनेश्वर कुकडे
Tuesday, 9 February 2021

कोणाच्याही घरी जबरीनेलोकांचे अतिथ्य घेणे ही प्रचारक असतानाची आपली भूमिका होती. तेव्हा कोणीही बोलावल्यास त्याठिकाणी जाणे अगत्याचेच होते.

गोंदिया ः  स्व. मनोहरभाई पटेल यांच्या 115 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आज गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक वितरण सोहळा गोंदियातील नमाद महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते.  

मी संघाचा स्वयंसेवक आहे. "मान न मान, मै तेरा मेहमान' अशा वातावरणात आपण वावरलो आहोत. कोणाच्याही घरी जबरीनेलोकांचे अतिथ्य घेणे ही प्रचारक असतानाची आपली भूमिका होती. तेव्हा कोणीही बोलावल्यास त्याठिकाणी जाणे अगत्याचेच होते. प्रफुल्ल पटेल यांनी बोलावले, म्हणून गोंदियाला येता आले. आपले प्रचारक विश्‍वनाथ लिमये हे गोंदियाचेच असल्याने गोंदियाला येण्याची आपली फार पूर्वीपासूनची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण झाली. असे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी सांगितले. 

हेही वाचा - ...अन् ५० कोटी मिळवा, अजित पवारांची खुली ऑफर

राज्यपाल कोश्‍यारी म्हणाले की, मनोहरभाई पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. त्यांच्यात एक दिव्यगुण, अलौकिक सात्त्विक गुण होते. त्यांच्या परिश्रमाने व तपस्याने गोंदिया शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले. प्रफुल्ल पटेलांनी त्यांचा हा शैक्षणिक वारसा जोपासला असून, हा वारसा ते पुढे नेत आहेत.

ते म्हणाले, पदकप्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. आज शिक्षणात मुलींनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. ग्रामीण भागातील महिलांनीसुद्धा आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. मातृशक्तीचा हा जागर शैक्षणिक क्रांतीमुळेच शक्‍य झाला. यावेळी त्यांनी प्राथमिक व महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. 

नक्की वाचा - ब्राम्हणवाडा जंगलात आढळला वाघिणीचा मृतदेह, शवविच्छेदन करताच बसला धक्का

मोदींच्या कानमंत्रावर चालताहेत पटेल 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा "सबका साथ, सबका विश्‍वास, सबका विकास" हा कानमंत्र असून, या कानमंत्रावर प्रफुल्ल पटेल चालत आहेत, असे राज्यपाल कोश्‍यारी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यक्रमाचे संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praful Patel follows PM Narendra Modis views said Governor Bhagat Singh Koshyari in Gondia