Loksabha 2019 : महाआघाडीचे मार्ग बंद, आता माघार नाही : आंबेडकर 

सुगत खाडे
सोमवार, 18 मार्च 2019

अकोल्याचा निर्णय गुलदस्त्यात 
वंचित बहुजन आघाडीतर्फे अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर लढणार किंवा नाही, याबाबतचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे. याबाबत ते आज घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कॉंग्रेससोबत आघाडीचे सर्व मार्ग बंद झाल्याने आता सर्वच जागांवर उमेदवार घोषित केले जातील तेव्हाच अकोल्यातील उमेदवाराचे नावही निश्‍चित होईल, असे सांगण्यात आले. 

अकोला : "कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही जाहीर केलेले 22 उमेदवार आता माघार घेणार नसून, वाटल्यास कॉंग्रेसने त्यांचे "एबी' अर्ज या 22 उमेदवारांना द्यावेत. वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पंधरा मार्चला सर्व 48 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, ""वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत. कॉंग्रेसकडे अनेक मतदारसंघांत उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या 22 जागांचा प्रस्ताव मान्य करावा, असे कॉंग्रेस नेत्यांना कळविण्यात आले होते. यासंदर्भात लक्ष्मण माने आणि अण्णाराव यांनी कॉंग्रेस नेत्यांसोबत काल चर्चा केली. त्यांना हा प्रस्ताव मान्य नाही. त्यामुळे महाआघाडीत वंचित बहुजन आघाडीने सहभागी होण्याचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत.'' 

पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा सिरसाट आदी उपस्थित होते. 

अकोल्याचा निर्णय गुलदस्त्यात 
वंचित बहुजन आघाडीतर्फे अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर लढणार किंवा नाही, याबाबतचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे. याबाबत ते आज घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कॉंग्रेससोबत आघाडीचे सर्व मार्ग बंद झाल्याने आता सर्वच जागांवर उमेदवार घोषित केले जातील तेव्हाच अकोल्यातील उमेदवाराचे नावही निश्‍चित होईल, असे सांगण्यात आले. 

कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाही 
प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढणार नाहीत, अशी शक्‍यता असल्याने त्यांच्या जागेवर प्रा. अंजलीताई आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी आंबेडकर कुटुंबातील कुणालाही दिली जाणार नाही, असे स्पष्ट करून या चर्चेला पूर्णविराम दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar clears on not alliance with Congress NCP