...आणि तेलतुंबडे प्रकरणाबाबत प्रकाश आंबेडकरांना घ्यावी लागली ही भूमिका

मनोज भिवगडे
Saturday, 18 April 2020

शहरी नकक्षलवादाच्या नावाखाली राज्यात सुरू असलेल्या राजकारणात तेलतुंबडे प्रकरणात कार्यकर्ते व नेते भावनिक होऊन त्यांचे विचार माध्यमांवर व सोशल मीडियावर मांडत सुटले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत भूमिकेबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेली भूमिकाच अधिकृत असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले.

अकोला : राज्यातील राजकारण आनंद तेलतुंबडे प्रकरणानंतर ढवळून निघाले आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकरणात थेट भूमिका मांडताना जाहिल वक्तव्य करण्यास सुरुवात केली. राज्यात कोरोना विषाणूचे संकट असताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जहाल भूमिकांमुळे प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या भूमिकेशिवाय कुणीही कोणेतीत भूमिका मांडू नये, अशी सूचना राज्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.

आनंद तेलतुंबडे हे दलित चळवळीतील आघाडीचे विचारवंत आहेत. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. 31 डिसेंबर 2017ला झालेल्या एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात काही विचारवंतांना, लेखकांना 28 ऑगस्ट 2018 ला अटक करण्यात आली होती. हे अटकसत्र सुरू असताना आनंद तेलतुंबडे यांच्या घरावरही छापा मारण्यात आला होता. आनंद तेलतुंबडेंच्या मते पोलिसांनी कोणतंही वॉरंट नसताना त्यांच्या अनुपस्थितीत घराची झडती घेतली.

आवश्यक वाचा - दिलासादायक : हा जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर

घराचे चित्रीकरण केलं आणि घर पुन्हा बंद केलं. तेव्हा तेलतुंबडे मुंबईत होते. हा सगळा प्रकार समजल्यावर त्यांची पत्नी गोव्याला गेली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आनंद तेलतुंबडे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी ता. 14 एप्रिल रोजी एनआयएच्या कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केलं. त्यावेळी प्रकाश आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे, आनंद आंबेडकर, आमदार कपिल पाटील उपस्थित होते. यानंतर कोर्टाने त्यांना 18 एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला आहे.

हेही वाचा - देशी दारूच्या काॅर्टरची किंमत 55 वरून 200 रुपये; येथे सहज होते उपलब्ध 

या सर्व प्रकरणानंतर राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वेगवगेळ्या माध्यमातून, सोशल मीडियातून त्यांची भूमिका जाहीरपणे मांडण्यास सुरुवात केली. अशा प्रकारच्या जाहीर भूमिकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीची अधिकृत भूमिका ही बाळासाहेबच मांडतील. त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही काही भूमिका मांडली तर ती पक्षाची अधिकृत भूमिका नसेल किंवा जाहीरपणे वक्तव्य करूच नये अशी सूचना बाळासाहेबांनी पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांच्या माध्यमातून राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली आहे.

कार्यकर्त्यांना दिली ही सूचना
वंचित बहूजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सूचित करण्यात येते की, पक्षाचेवतीने येणारे कुठलेही आदेश, प्रतिक्रिया अथवा भूमिका या पक्षाच्यावतीने लेटर पॅडवर काढण्यात येतातकिंवा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या व्हिडिओ अथवा त्यांचे फेसबुक पेज आणि ब्लू टिक असलेल्या ट्विटर हँडल वरून प्रसारित केल्या जातात. अथवा बाळासाहेब आंबेडकर पत्रकार परिषद घेऊन जाहिर करतात. सबब या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे पक्षाचे वतीने अधिकृतपणे जाहीर होणाऱ्या भूमिकांशी विसंगत मांडणी कुणीही करू नये. ही सूचना पक्षाचे प्रवक्त डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि राजेंद्र पातोडे यांच्यावतीने सर्वांना देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash ambedkar stand will be final against teltumbde issue