नागपूरला प्रथमच प्रवासी भारतीय सन्मान!

नितीन नायगावकर
शनिवार, 19 जानेवारी 2019

नागपूर : शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि चीनमधील डोहलर ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) अमित वाईकर यांना यंदाचा प्रवासी भारतीय सन्मान जाहीर झाला आहे. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले नागपूरकर आणि चीनमधील पहिले भारतीय आहेत. 21 ते 24 जानेवारी या कालावधीत वाराणसी येथे आयोजित प्रवासी भारतीय दिवस सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

नागपूर : शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि चीनमधील डोहलर ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) अमित वाईकर यांना यंदाचा प्रवासी भारतीय सन्मान जाहीर झाला आहे. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले नागपूरकर आणि चीनमधील पहिले भारतीय आहेत. 21 ते 24 जानेवारी या कालावधीत वाराणसी येथे आयोजित प्रवासी भारतीय दिवस सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
अमित हे उर्दूचे गाढे अभ्यासक स्व. डॉ. विनय वाईकर यांचे सुपुत्र असून शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे नेतृत्व त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे त्यांना अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शांघायमध्ये स्वागत करण्याचा मानही मिळाला होता. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने भारताबाहेर विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या 50 लाख भारतीयांपैकी जवळपास एक हजार लोकांचा या पुरस्कारासाठी विचार होतो. त्यापैकी केवळ तीस लोकांची निवड करण्यात येते. यंदा या तीसमध्ये अमित यांचा समावेश आहे. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, परराष्ट्र सचिव यांच्यासह पाच जणांच्या समितीने अमित वाईकर यांची या सन्मानासाठी निवड केली आहे. 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यानिमित्त 2003 पासून हा दिवस अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी साजरा केला जात आहे. दर दोन वर्षांतून हा पुरस्कार सोहळा भारतात होतो. या कार्यक्रमात अनिवासी भारतीयांची विदेशातील प्रगती, त्यांच्या प्रगतीबाबतच्या कल्पना, विदेशी धोरण आदी बाबतीत चर्चा आणि विचारविनिमय होत असतो. दोन वर्षांपूर्वी बंगळुरू येथे आयोजित प्रवासी भारतीय दिवसासाठी अमित वाईकर यंदा आमंत्रित करण्यात आले होते. यंदा त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सुवर्णपदक आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. वाराणसी येथे 21 ते 23 जानेवारी या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 24 जानेवारीला सत्कारमूर्तींना कुंभमेळ्यात शाही स्नानाची संधीही मिळणार आहे. 26 जानेवारीला दिल्लीतील गणराज्यदिनाच्या परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून ही मंडळी उपस्थित राहतील. विशेष म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रातील केवळ चार ते पाच मंडळींना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

विदेशात असलो तरी भारताशी, नागपूरशी माझी नाळ जुळलेली आहे. या बांधीलकीचाच हा गौरव आहे.
- अमित वाईकर
माजी अध्यक्ष, इंडियन असोसिएशन शांघाय (चीन)

Web Title: Pravasi Bharatiya Honor for the first time Nagpur