निसर्ग संवर्धनात ‘प्रयासवन’ एक साधनाच : राज्यपाल कोश्यारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat-singh-koshyari

निसर्ग संवर्धनात ‘प्रयासवन’ एक साधनाच : राज्यपाल कोश्यारी

यवतमाळ : कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक असते. निसर्ग संवर्धनात प्रयासतर्फे करण्यात आलेली ’प्रयासवना’ची निर्मिती ही अनेक वर्षांची एक साधनाच असेल, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. गुरुवारी (ता. 25) सकाळी नऊदरम्यान प्रयासवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रयास या सेवाभावी संस्थेने गोधनी मार्गावरील शहराला लागून असलेल्या वनविभागाच्या 25 एकर जागेत ’प्रयासवन’ तयार केले आहे. विविध प्रकारच्या फळ, फुले व ऑक्सिजन देणार्‍या, औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या हजारो झाडांची लागवड केली आहे. प्रयासवन भविष्यात एक आदर्श पर्यटनस्थळ बनणार आहे. याठिकाणी राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांनी आज वृक्षारोपण केले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, प्रयासवनचे अध्यक्ष डॉ. विजय कावलकर, उपवनसंरक्षक किशोर वाबळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. राज्यपाल पुढे म्हणाले, ’प्रयासवन उभारणीत लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी मदत करीत आहेत. त्यांचे अधिकाधिक सहकार्य घेऊन पुढील पाच ते सहा वर्षांत चांगले वन तयार झाल्याचे दिसेल.

प्रत्येक व्यक्तीला प्रयासवन येथे येण्याची आवड स्वत:हून निर्माण होईल.’ प्रयासचे अध्यक्ष डॉ. विजय कावलकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, शासनाच्या त्रिपक्षीय करारानुसार वनविभागाच्या 25 एकर जागेत प्रयास या संस्थेमार्फत आतापर्यंत आठ हजार चारशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. येथे वृक्ष संवर्धनातून प्रयासवन साकारण्यात आले आहे. याठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ’बेल’ या वृक्षाची लागवड करून करण्यात आला. तसेच ’पंचवटी’ वनाचे लोकार्पण व जैविक खत निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभदेखील राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करून करण्यात आला.

यावेळी राज्यपाल डॉ. कोश्यारी यांनी पंचवटी वनाचे महत्त्व प्रा. माणिक मेहरे यांच्याकडून, तर जैविक खत निर्मिती प्रकल्पाची माहिती डॉ. संगीता सव्वालाखे यांच्याकडून जाणून घेतली. त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ’प्रयास’ च्या वतीने अध्यक्ष डॉ. विजय कावलकर यांचेहस्ते शाल, श्रीफळ, वृक्ष, पुस्तिका प्रदान करून राज्यपाल डॉ. भगत सिंह कोश्यारी यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे सचिव मंगेश खुने यांनी संचालन केले, तर अश्‍विन सवालाखे यांनी आभार मानले.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशन मुंबईत! २२ ते २९ डिसेंबरला होणार अधिवेशन

शिवाजीला चॉकलेट

प्रयासवनात राज्यपाल डॉ. कोश्यारी यांचे आगमन होताच जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार मदन येरावार व प्रयासचे अध्यक्ष डॉ. विजय कावलकर यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून ते कार्यक्रमस्थळी जात असताना त्यांच्या बाजूने एक पाच वर्षांचा मुलगा शिवाजी श्रीकांत राऊत त्या गर्दीतून चालताना त्यांना दिसला. राज्यपाल डॉ. कोश्यारी यांनी त्या मुलाला चॉकलेट देऊन त्यांचे नाव विचारले व कौतुक केले.

loading image
go to top