प्रीमिअम तत्काळच्या नावावर प्रवाशांची लुट

प्रवीण खेते
शुक्रवार, 11 मे 2018

प्रीमिअम तत्काळ काेट्याची लिंक सकाळी १० वाजता सुरू हाेते. ही लिंक एक तासासाठी म्हणजेच ११ वाजतापर्यंत सुरू राहते. त्यामुळे या एक तासात प्रवाशांना आवश्यक ते तिकीट सहज मिळू शकते.

अकाेला - उन्हाळी सुट्या अन् लग्न सराईची घाई, यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. आरक्षण काेट्यात दाेन महिन्यांची प्रतीक्षा यादी, तर तत्काळ काेट्यावर दलालांचा राज अशी प्रवाशांची चौफेर काेंडी झाली असताना, प्रीमिअम तत्काळ काेट्याच्या नावाखाली प्रवाशांची डबल लुट हाेत असल्याचे समाेर आले आहे.

वाढत्या गर्दीत आपला प्रवास सुरळीत व आरामदायी व्हावा, म्हणून लांब पल्याचे प्रवाशी तिकीट आरक्षित करून घेत आहेत. आरक्षण काेट्यात दाेन महिन्यांची प्रतीक्षा यादी असल्याने बहुतांश प्रवाशी एक दिवसाआधी तत्काळ आरक्षण काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, दलालांमुळे प्रवाशांच्या हाती केवळ निराशा येत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांसाठी प्रीमिअम तत्काळ काेटा हा एक पर्याय आहे. परंतु, या तिकिटासाठी नेमके किती पैसे माेजावे लागतील हे निश्चित नाही. तिकीटाची रक्कम तिकीट कन्फर्म झाल्यावरच कळते. त्यामुळे ४०० रुपयांचं तिकीट ८०० रुपयाला किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीत देखील मिळू शकते. तिकीट शुल्काच्या अनिश्चिततेमुळे प्रवाशांची आर्थिक लुट हाेत आहे. शिवाय, दलालांकडून ही या तिकीटासाठी प्रवाशांना वेठीस धरल्या जात आहे.

प्रीमिअम तत्काळसाठी एक तास
प्रीमिअम तत्काळ काेट्याची लिंक सकाळी १० वाजता सुरू हाेते. ही लिंक एक तासासाठी म्हणजेच ११ वाजतापर्यंत सुरू राहते. त्यामुळे या एक तासात प्रवाशांना आवश्यक ते तिकीट सहज मिळू शकते. परंतु, त्यासाठी दाम दुप्पट माेजण्याची तयारी प्रवाशांना ठेवावी लागते.

दलालांकडून केल्यास तिप्पट दाम
प्रीमिअम तत्काळ काेट्यातून तिकीट करायचे आणि त्यासाठी तुम्ही दलालाची मध्यस्ती घेतली असेल, तुमच्याकडून तिप्पट दाम वसूल केल्या जाईल. त्यामुळे यामध्ये दलालाची मध्यस्ती न घेतलेलीच बरी.

असं करा प्रीमिअम तत्काळ तिकीट आरक्षित
जर तुम्हाला ठरलेल्या तारखेला रेल्वेचा प्रवास करायचा असेल, आणि तत्काळ काेटाही हाऊसफुल्ल असेल, तर तुम्ही प्रीमिअम तत्काळ काेट्यातून तिकीट आरक्षित करू शकता. मात्र, यासाठी दाम दुप्पट माेजावे लागतील. यामध्ये दलालाची मध्यस्ती करण्याची आवश्यकता नाही. प्रीमिअय तत्काळ काेट्यातून तिकीट आरक्षित कसं करायचं, चला तर बघुया.

Web Title: Premium Tatkal Railway Tickets