खातेदारांच्या ठेवीवर रोखपालाचा डल्ला; अध्यक्ष संतोष रावतांच्या पारदर्शकतेचा फुगा फुटला

President Santosh Rawat's transparency bubble burst Chandrapur District Central Co operative Bank News
President Santosh Rawat's transparency bubble burst Chandrapur District Central Co operative Bank News

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे नवे अध्यक्ष संतोष रावत यांच्या चार महिन्यांच्या काळातच मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला. चंद्रपुरातील जिल्हा परिषदेसमोरील बॅंकेच्या शाखेतील रोखपाल निखिल घाटे याने खातेदारांना तब्बल दीड कोटींनी चुना लावला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचू नये, यासाठी काही संचालकांनी ‘फिल्डिंग’ लावली.

शनिवारला पहाटे पाच वाजता बॅंकेकडून थातुरमातूर तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर गुन्हा दाखल होणार नाही, अशी खात्री पडद्यामागील संचालकांना होती. अपेक्षेप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शविली. मात्र, या कोट्यवधींच्या अपहाराचे प्रकरण अंगलट येऊ शकते, याची खात्री पटल्यानंतर रावत यांच्या सूचनेवरून सायंकाळी पुन्हा तक्रार दाखल करण्यात आली.

आठ महिन्यांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना नोकरभरती आणि खरेदी प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली. विद्यमान अध्यक्ष संतोष रावत आणि त्यांचे निकटवर्तीय सल्लागार रवींद्र शिंदे, संदीप गड्डमवार आणि त्यांच्या कंपूने पाऊणकर यांना जेलवारी घडविली. त्यानंतर रावत अध्यक्ष झाले. त्यामुळे रावतांच्या हातात बॅंक सुरक्षित राहील, अशी अपेक्षा होती. रावत आणि त्यांचा कंपूसुद्धा नेहमीच पारदर्शकतेचा आव आणायचे.

मात्र, चार महिन्यांतच त्यांच्या पारदर्शकतेचा फुगा फुटला आणि घोटाळ्याने बॅंक हादरली. जिल्हा परिषदेसमोरील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेतील रोखपाल निखिल घाटे यांनी शेकडो ग्राहक आणि खातेदार संस्थांना चुना लावला. बॅंकेत जमा करण्यासाठी येणाऱ्या खातेदारांना पैसे जमा केल्याची पावती घाटे द्यायचे. परंतु, ते पैसे बॅंकेत जमा करायचे नाही. मागील चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. 

दरम्यान, जनता शासकीय-निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या, चंद्रपूर यांनी ९ ऑक्‍टोबर २०२० ते ३१ ऑक्‍टोबर २०२१ या काळात या शाखेत तब्बल पन्नास लाख रुपये जमा केले. त्याच्या पावत्या त्यांना मिळाल्या. परंतु, ही रक्कम खात्यावर जमा झाले नसल्याचे संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. याची तक्रार बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पोटे यांच्याकडे केली. तोपर्यंत घोटाळ्याची माहिती नव्हती, असे रावत आता सांगत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंक संगणकीकृत आहे. प्रत्येक शाखेत सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहे. अशा परिस्थितीत मागील चार महिन्यांपासून सुरू असलेली  खातेदारांची कोट्यवधीची लूट अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आली नाही, यावरच आता संशय व्यक्त केला जात आहे. घोटाळ्याचा आकडा दीड कोटीपेक्षा मोठा असल्याचे समजते. यात रॅकेट सक्रिय असून बॅंकेतील अधिकारी आणि काही संचालकांचा सहभाग असू शकतो, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

तक्रारीचे नाटक आणि तक्रार

जनता शासकीय-निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्थेची 50 लाख रुपये गहाळ झाल्याची तक्रार बॅंकेला प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष संतोष रावत यांच्यासह सर्वांचेच धाबे दणाणले. रावत हे निकटवर्तीय सल्लागार रवींद्र शिंदे यांच्यासह घोटाळा झालेल्या बॅंकेत पोचले.  काही वेळे तिथे थांबले आणि त्यांनी काढता पाय घेतला पहाटे पाच वाजेपर्यंत हिशेब आणि खातेदारांच्या खात्यातील नोंदी तपासण्याचे काम सुरू होते. बॅंकेतील महिला-पुरुष कर्मचाऱ्यांना रात्रभर थांबविले गेले. अध्यक्षांनी पहाटे 5 वाजता व्यवस्थापक रजनी सपाटे यांना तक्रार द्यायला सांगितले. मात्र, दिलेली तक्रार आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांची भूमिका बघता रोखपाल घाटे यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका निर्माण झाली. या तक्रारीवर गुन्हाच दाखल होऊ शकत नाही, असे रामनगरचे ठाणेदार प्रकाश हाके यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. एवढे गंभीर प्रकरण असतानाही रावत आज दिवसभर बॅंकेकडे फिरकले नाही. शेवटी प्रकरण अंगलट येऊ शकते, असे लक्षात येताच सायंकाळी नवी तक्रार दाखल करण्यासाठी सपाटे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी पोटे रामनगर ठाण्यात पाठविले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यानच्या काळात रोखपाल घाटे चंद्रपुरातून फरार झाला.

अठ्ठेचाळीस लाख आले कुठून?

घोटाळेबाज रोखपाल निखिल घाटे याच्याकडे चौकशीसाठी अधिकारी पोचताच तो बॅंकेतून फरार झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी लाटलेली रक्कम परत करण्याची तयारी दाखविली. अध्यक्ष रावत आणि मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला होकार दिला आणि सातच्या सुमारास घाटे कुटुंबीय तब्बल अठ्ठेचाळीस लाख रुपयांची रोकड घेऊन बॅंकेत पोचले. बॅंकेचा कामाचा वेळ संपला असतानाही ती रक्कम खात्यात जमा करण्यात आली. घाटे सारख्या सामान्य रोखपालाच्या घरी एवढी मोठी रक्कम बघून सहकारी कर्मचारीही अचंबित झाले. खातेदारांची रक्कम घाटे व्याजाने द्यायचे. काही संचालक जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. काही बांधकाम व्यावसायिक आहे. त्यांनाही खातेदारांची रक्कम दोन-तीन दिवसांसाठी घाटे वापरायला द्यायचा, अशी चर्चा बॅंकेच्या वर्तुळात आहे. घाटे यांचे काही संचालकांशी स्नेहपूर्ण सबंध होते. त्यामुळेचे त्यांची मूल येथे दोन महिन्यांपूर्वी प्रतिनियुक्तीवर झालेली बदली अवघ्या दोन तासात रद्द झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com