
यवतमाळ : बालकांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या भेटीत भांबोरा 'पीएससी'च्या कारभाराचे पितळ उघडे पडले. एकूणच यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या दांडीमुळे पूर्णत: आजारी पडले आहेत. आरोग्यसेवा सुदृढ करण्यासाठी बूस्टर डोस देण्याची गरज निर्माण झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात 63 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नर्स, कर्मचारी अशाप्रकारे हजारो कर्मचारी दिमतीला आहे. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची आहे. मात्र, डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नाहीत. अधिकारीच येत नसल्याची संधी साधून इतर कर्मचारीही दांडी मारण्यात तरबेज झाले आहेत. सॅनिटायझर प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. दोन) घाटंजी तालुक्यातील भांबोरा 'पीएचसी'चे ऑपरेशन केले. त्यात वैद्यकीय अधिकारी नियमित उपस्थित राहत नसल्याचा प्रकार समोर आला. शिवाय कर्मचारीही आपल्याच मर्जीने वागत असल्याचे स्पष्ट झाले. 'पीएचसी'ची यंत्रणा आजारी असल्याचे सांगण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या अपेक्षेने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टर राहत नाहीत. उपस्थित असलेला कोणताही कर्मचारी उपचारासाठी आलेल्या रुग्णांना गोळ्या, औषधी देऊन बोळवण करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आजारी पडलेल्या आरोग्य यंत्रणेला सुदृढ करण्यासाठी बूस्टर डोस देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण रात्री-अपरात्री उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. त्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी हजर राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यात कुणीही निष्काळजीपणा करीत असल्याचे समोर आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. कुणाचीही गय केली जाणार नाही.
- डॉ. हरी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.