esakal | मुद्रण व्यवसायही ठप्प, गडचिरोलीतील व्यावसायिक चिंतेत
sakal

बोलून बातमी शोधा

printing

गडचिरोलीसारख्या शहरातील मोठ्या मुद्रणालयाचा फक्त उन्हाळ्यातील कमाईचा आकडा पाच ते सहा लाखांच्या घरात सहज जायचा. पण, लॉकडाउन सुरू झाले आणि हे सारेच बंद झाले. लग्न सोहळे नाहीत, राजकीय सभा, मेळावे, परीक्षा नाहीत. आता लॉकडाउन शिथिल झाले असले, तरी दरवर्षीच्या या मोठ्या हंगामात झालेले नुकसान खूप मोठे आहे.

मुद्रण व्यवसायही ठप्प, गडचिरोलीतील व्यावसायिक चिंतेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : मागील काही वर्षांत नव्या तंत्रज्ञानामुळे वेगाने विस्तारलेला प्रिंटिंग अर्थात मुद्रण व्यवसाय यंदा कोरोनामुळे डबघाईस आला आहे. उन्हाळ्यात पाच लाखांहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या उन्हाळ्यात व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने पाच हजार रुपयेही मिळाले नाहीत. आता ही दुकाने पुन्हा सुरू झाली असली, तरी ग्राहकांची पावले दुकानाकडे वळताना दिसत नाहीत, त्यामुळेही व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

छपाई तंत्राची सुरुवात गटेनबर्ग याने जर्मनीमध्ये केली असे मानले जाते.
तत्पूर्वी प्रति निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. पुढे त्यासाठी अनेक यंत्रे विकसित झाली. यात शिफ्ट फेड यंत्र, रोल फेड यंत्र ज्याला वेबफीड यंत्र किंवा रोटरी यंत्र असेही म्हणतात. या यंत्राच्या वापराने या व्यवसायाला गती आली. पुढे संगणक युग अवतरल्यावर या व्यवसायाची प्रगती वाऱ्याच्या वेगाने झाली. डिजिटल छपाईमध्ये नवनवे तंत्रज्ञान येत गेले. ब्ल्यू प्रिंट, डेझी व्हील, डॉट मॅट्रिक्‍स , लाइन छपाई, हिट ट्रान्सफर मशीन, इंक जेट, इलेक्‍ट्रोग्राफी, लेझर छपाई अशा नवनव्या तंत्रज्ञानामुळे हा व्यवसाय चांगले बाळसे धरू लागला होता.

पूर्वी कोणत्याही कार्यक्रमाचे फलक, बॅनर्स कापडावर रंगविले जायचे. त्यासाठी चित्रकारांना बोलवावे लागायचे. या कामात वेळ खूप जायचा आणि खर्चही खूप व्हायचा. पण, फ्लेक्‍स प्रिंटिंग तंत्रज्ञान आल्यावर तर या व्यवसायाने जणू कातच टाकली होती.

पूर्वी केवळ कार्यक्रम, राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसाठी बनविले जाणारे फ्लेक्‍स बॅनर्स आता अगदी बारशाच्या कार्यक्रमापासून लग्न, घरगुती सण, छोट्या, मोठ्या बैठकांपर्यंत बनविण्यात येऊ लागले. त्यामुळे मुद्रणालयात गर्दी वाढू लागली. शिवाय उन्हाळ्यात लग्न सराईत पत्रिका छपाई, शाळा, महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी प्रश्‍न पत्रिका छपाई, दुकानांचे होर्डीग्स, विविध व्यक्तींच्या वाढदिवसाचे, मोठ्या नेत्यांच्या आगमनाचे बॅनर्स, भित्तिपत्रके, माहितीपत्रके, अशा अनेक कामांसाठी ही मुद्रणालये गर्दीने ओसंडत असायची.

गडचिरोलीसारख्या शहरातील मोठ्या मुद्रणालयाचा फक्त उन्हाळ्यातील कमाईचा आकडा पाच ते सहा लाखांच्या घरात सहज जायचा. पण, लॉकडाउन सुरू झाले आणि हे सारेच बंद झाले. लग्न सोहळे नाहीत, राजकीय सभा, मेळावे, परीक्षा नाहीत. आता लॉकडाउन शिथिल झाले असले, तरी दरवर्षीच्या या मोठ्या हंगामात झालेले नुकसान खूप मोठे आहे. आताही फ्लेक्‍स बॅनर्स व इतर छपाई कामांची फारशी मागणी नाही. त्यामुळे या मुद्रणालयांमध्ये शुकशुकाट आहे.
पर्यायांच्या शोधात...
मुद्रण व्यवसाय फायद्याचा असला, तरी बदलत्या तंत्रज्ञानासोबत पुढे जात राहावे लागते. त्यासाठी या व्यवसायातही गुंतवणूक मोठी आहे. शिवाय अनेकजण वेळेवर पैसे देत नाहीत. त्यामुळे थकीत रकमेचाही प्रश्‍न असतोच. शिवाय कामांचा व्याप, दगदग, रात्रीची जागरणे असतातच. त्यात आता मोठे नुकसान झाल्याने अनेक व्यावसायिक पर्यायी व्यवसायाच्या शोधात असल्याचे कळते.

सविस्तर वाचा - कोरोना ब्रेकिंग : या शहराने पार केला हजाराचा पल्ला, गुणाकार पद्धतीने होतेय वाढ

चांगले दिवस नक्‍की येतील
कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अनेक व्यवसायांसोबत आमच्या व्यवसायालाही मोठा फटका बसला. उन्हाळ्याचा काळ आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे या काळात झालेले नुकसान मोठे आहे. मात्र, अशा संकटांचा सामना करत पुढे जावेच लागेल. विपरीत परिस्थिती कायम नसते. पुन्हा चांगले दिवस नक्‍की येतील.
आशुतोष कोरडे, प्रिंटिंग व्यावसायिक, गडचिरोली

loading image