कोरोनाचा वाढता विळखा, कारागृहातील बंदीवान पॉझिटिव्ह आल्याने वर्धेत खळबळ

रूपेश खैरी
Monday, 14 September 2020

नागपूर कारागृहात असलेले बंदी पॉझिटिव्ह आल्याने वर्धेत सुरक्षेचा उपाय म्हणून क्वारंटाइन कारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा लाभ होत असून येथील जिल्हाकारागृह आतापर्यंत कोरोनामुक्त राहिले आहे.

वर्धा  :  विदर्भात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत असून, नागपूरसोबतच इतर जिल्ह्यातही कोरोनाने पाय पसरले आहे. नागपुरात कोरोना हाताबाहेर गेला असून बाधितांसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरातील मध्यवर्ती कारागृह कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनले होते. आता वर्धेतील कारागृहातील कैद्याला कोरोनाची लागण झाली असून, यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.  

नागपूर कारागृहात असलेले बंदी पॉझिटिव्ह आल्याने वर्धेत सुरक्षेचा उपाय म्हणून क्वारंटाइन कारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा लाभ होत असून येथील जिल्हाकारागृह आतापर्यंत कोरोनामुक्त राहिले आहे. परंतु, सोमवारी (ता. १४) एक बंदी पॉझिटिव्ह आला आहे. तो क्वारंटाइन कारागृहात असल्याने इतर बंदी  सुरक्षित आहेत. त्याला उपचाराकरिता कोविड केंद्रात पाठविण्यात आले आहे.

महत्त्वाची बातमी - अरे हे काय... सोन्याचे भाव घटले, तरीही ग्राहक फिरकेना, या महिन्यात दरवाढ होण्याचे संकेत

 
विविध गुन्ह्यांत न्यायालयाने कारागृहात रवाना केलेल्या आरोपींना थेट कारागृहात न ठेवता प्रथम क्वारंटाइन कारागृहात ठेवण्यात येते. येथे १४ दिवस राहिल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करूनच त्याला कारागृहात नेण्यात येत आहे. यात सहा दिवस येथे राहिल्यानंतर या बंदीची प्रकृती खालावल्याने त्याची कोविड चाचणी करण्यात आली.  

ती पॉझिटिव्ह आली. सध्या या कारागृहात दहा बंदी क्वारंटाइन आहेत. येथे प्रत्येकाची वेगवेगळी व्यवस्था केल्याने याचा इतरांवर काहीच परिणाम पडणार नसल्याची माहिती कारागृह व्यवस्थापनाकडून देणयात आली आहे. 
 

उपचाराकरिता कोविड केंद्रात दाखल 
कारागृहात येणाऱ्या आरोपीला प्रथम येथील क्वांरटाइन कारागृहात ठेवण्यात येते. येथे त्याची आरोग्य तपासणी करून नंतरच त्याची रवानगी कारागृहात होते. यातच एक बंदी आज पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. त्याला उपचाराकरिता कोविड केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. 
- सुहास पवार, अधीक्षक जिल्हा कारागृह

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prison inmates is Corona positive at Wardha