अरे हे काय... सोन्याचे भाव घटले, तरीही ग्राहक फिरकेना, या महिन्यात दरवाढ होण्याचे संकेत

राजेश रामपूरकर
Monday, 14 September 2020

अमेरिकी उत्पादनात झालेली वाढ व बेरोजगारीचे कमी झालेले आकडे यामुळे महामारीच्या घसरणीनंतर जलद रिकव्हरी होण्याची आशा निर्माण झाल्याने सोन्याच्या दरात घसरण सुरू झाल्याचे बोलले जात आहे. सध्या भारतीय बाजारावरही पितृपक्ष आणि चार दिवसानंतर अधिक महिना सुरू होत असल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीकडे पाठ आहे.

नागपूर : जगभरातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये आर्थिक स्थितीत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव वाढू लागल्याने सोन्याच्या किमतीत घसरण झालेली आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोनाची भीती, पितृपक्ष आणि अधिक मास आल्याने यंदा सणासुदीचे दिवस लांबल्याने सराफा बाजारात वर्दळ मंदावली आहे. मात्र, नवरात्रोत्सवानंतर बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सोने आणि चांदीमध्ये गेल्या २० दिवसांपासून सतत चढ-उतार सुरू आहे. दरम्यान, सोने काही प्रमाणात स्वस्त झाल्याने सराफा बाजारात सोन्याची मागणी किंचित वाढल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अमेरिकेची सकारात्मक आर्थिक आकडेवारी अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सोन्याविषयीचे आकर्षण कमी झाले आहे.

अधिक माहितीसाठी - कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात? 
 

अमेरिकी उत्पादनात झालेली वाढ व बेरोजगारीचे कमी झालेले आकडे यामुळे महामारीच्या घसरणीनंतर जलद रिकव्हरी होण्याची आशा निर्माण झाल्याने सोन्याच्या दरात घसरण सुरू झाल्याचे बोलले जात आहे. सध्या भारतीय बाजारावरही पितृपक्ष आणि चार दिवसानंतर अधिक महिना सुरू होत असल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीकडे पाठ आहे. तसेच टाळेबंदीच्या भीतीने सराफा व्यापाऱ्यांनीही अद्यापही सोन्याची खरेदी केलेली नसल्याने तेही बाजाराचा अंदाज घेत आहेत.

ग्राहकांची सोन्याला मागणी नसल्याने सध्या दरही घटलेले आहेत. ही ग्राहकांसाठी सोने खरेदीची ही चांगली संधी आहे. मात्र, ग्राहक अजून दर कमी होतील या भ्रमात असतील तर त्यांचे अंदाज चुकणार असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिक महिना संपल्यानंतर सराफा व्यापाऱ्यांकडून सोन्याची खरेदी सुरू होईल. त्यामुळे देशात एकाचवेळी सोने खरेदी वाढेल आणि दरही चढ्या आलेखानुसार वाढतील. 

हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..
 

दरवर्षी राखीपासून बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी होते. यावर्षी सर्वच गणित बिघडले आहे. कोरोनाचे सावट, अधिक महिना यामुळे अद्याप बाजारात ग्राहक वाढलेले नाहीत. त्यामुळेच सोने गेल्या २० दिवसांपासून किंचित चढ-उतारावर स्थिरावले आहे. ५८ हजार रुपये दहा ग्रॅमवर गेलेले सोने ५२ हजारांच्या आतच स्थिरावलेले आहे.

नवरात्रीनंतर दर नक्कीच वाढतील
नवरात्रीनंतर सोन्याच्या खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. त्यानंतर दसरा, दिवाळी आणि लग्नसराई लक्षात घेता बाजारात ग्राहकांची गर्दी वाढून दागिन्यांच्या मागणीत वाढ होईल. तसेच टाळेबंदीमुळे यंदा एप्रिल ते जून महिन्यात निश्चित अनेक लग्न रद्द झाले. आता १०० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न करण्याची परवानगी प्रशासनाने दिलेली आहे. त्यामुळे या तीन महिन्यात रद्द झालेले लग्न समारंभ आणि डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्न समारंभानिमित्त सोन्याची मागणी वाढणार आहे. मागणी लक्षात घेता सोन्याचे दर ७५ हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर जाण्याची शक्यता आहे.
राजेश रोकडे, संचालक रोकडे ज्वेलर्स, 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect : gold prices down but market is not crowded with consumers