सीआयडीने ताबा घेताच पोलिस अधिकारी स्तब्ध; सात तासांनंतर उघडले लॉकअप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीआयडीने ताबा घेताच पोलिस स्तब्ध; सात तासांनंतर उघडले लॉकअप

सीआयडीने ताबा घेताच पोलिस स्तब्ध; सात तासांनंतर उघडले लॉकअप

अमरावती : संशयित आरोपीने राजापेठ ठाण्याच्या कोठडीत आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर याप्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली. त्यामुळे पुढील प्रक्रिया सुरू होईपर्यंत लॉकअपचे कुलूप तब्बल सात तास बंद होते. त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यातील संशयित आरोपीस प्रक्रिया सुरू होईपर्यंत त्याच कोठडीत थांबावे लागले. सागर श्रीपत ठाकरे (वय २४, रा. खंबीत, ता. आष्टी, जि. वर्धा) असे आत्महत्या करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.

सागरविरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याचा गुन्हा फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. ठाण्यात हेडकॉन्स्टेबल आणि तीन शिपाई अशी गार्ड ड्यूटी असते. त्यात बडनेरा, राजापेठ, नांदगावपेठ आणि फ्रेजरपुरा ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. प्रत्येकाने दोन तास ड्यूटीवर हजर राहावे, असा नियम आहे. परंतु, घटनेच्या वेळी तैनात पोलिस शिपाई तेथे हजर नसताना सागरने लॉकअपच्या गजाला शर्ट बांधून गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान, सकाळी ही घटना उजेडात येताच चांगलीच खळबळ उडाली. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर उपायुक्त विक्रम साळी व शशिकांत सातव यांच्यासह दोन्ही सहायक पोलिस आयुक्त, इतर चार ठाण्यांचे पोलिस निरीक्षक असा ताफा सीआयडीच्या मदतीला होता.

हेही वाचा: मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो

असा घडला घटनाक्रम

  • ३ ऑगस्ट : घडली घटना

  • ४ ऑगस्ट : अपहरणाचा गुन्हा

  • १७ ऑगस्ट : संशयित युवतीसह पोलिस ठाण्यात दाखल. अत्याचाराची कलम वाढली.

  • १८ ऑगस्ट : न्यायालयासमोर उपस्थिती, २० पर्यंत पोलिस कोठडी.

  • १९ ऑगस्ट : पोलिस कोठडीत आत्महत्या

याप्रकरणामध्ये सकाळी सहा ते आठ या वेळेत ड्यूटीवर तैनात असलेल्या पोलिस शिपायावर निलंबनाची कारवाई केली आहे. ड्यूटीवर तैनात इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस कोठडीत संशयित आरोपीच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीआयडी करणार आहेत.
- डॉ. आरती सिंह, पोलिस आयुक्त, अमरावती

ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी

घटनेनंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक अमोघ गावकर, प्रभारी उपअधीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनेच्या वेळी रात्रपाळीत तैनात चार कर्मचारी, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक या सर्वांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली.

हेही वाचा: अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना परत आणण्यात दर्यापूरच्या लेकीचा सहभाग

लॉकअपमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे

राजापेठ ठाण्याच्या आवारात एकूण ३० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्यापैकी दोन कॅमेरे हे पुरुष लॉकअपमध्ये लावलेले आहेत. फुटेज दाखवावे, अशी मागणी यावेळी ठाण्यात जमलेल्या नातेवाइकांनी केली.

कुटुंबातील एकाला नोकरी द्या

घटनेनंतर मृत सागरचे जावई व इतर नातेवाइकांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली. सागरच्या पोलिस कोठडीतील मृत्यूची निष्पःक्षपणे चौकशी करणे, जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईसह सागरच्या कुटुंबातील एकाला पोलिस विभागात नोकरी मिळावी, अशा मागण्या त्यांनी निवेदनातून केल्या.

१० वर्षांपूर्वी घडली होती घटना

दहा वर्षांपूर्वी वलगाव ठाण्याच्या पोलिस कोठडीत एका गुन्ह्यातील संशयित आरोपीने शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आयुक्तालयाच्या हद्दीतील ही दुसरी घटना आहे.

Web Title: Prisoner Commits Suicide In Thane Investigation To Cid Amravati Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..