esakal | प्रशासनाच्या आदेशाकडे काणाडोळा, कोविड रुग्णालयात सेवा देण्यास डॉक्टरांचा नकार

बोलून बातमी शोधा

Representative image

प्रशासनाच्या आदेशाकडे काणाडोळा, कोविड रुग्णालयात सेवा देण्यास डॉक्टरांचा नकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. यापार्श्‍वभूमीवर शहरातील खासगी डॉक्‍टरांची सेवा घेण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. या डॉक्‍टरांना महिन्यातून एकदा 'डेडीकेटेड कोविड रुग्णालयात' (डीसीएच) दिवसभर सेवा द्यायची आहे. याचे वेळापत्रक तयार होऊन चार दिवस झाले. परंतु, एकाही खासगी डॉक्‍टरने 'डीसीएच'ची पायरी चढली नाही.

हेही वाचा: आशिष देशमुखांचा सरकारला घरचा आहेर, राज्यात आणीबाणी लागू करण्याची पंतप्रधानांकडे मागणी

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महिला रुग्णालय आणि डीसीएची जबाबदारी केवळ सहा ते सात डॉक्‍टरांच्या खांद्यावर आहे. यातील तीन फक्त जनरल फिजिशियन आणि उर्वरित भूलतज्ज्ञ आहे. प्रचंड तणावात ही मंडळी काम करीत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांकडे त्यांना लक्ष देता येत नाही. साधनांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार दहा रुग्णांमागे एक डॉक्‍टर अपेक्षित आहे. सध्या शासनस्तरावर नवीन डॉक्‍टरांची नियुक्ती एवढ्या लवकर होणे शक्‍य नाही. दुसरीकडे रुग्णांचा रोजचा आकडा दीड हजारांच्या घरात गेला आहे. तो येत्या आवठड्याभरात दोन हजारापर्यंत जाईल, अशी भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांना आहे. कोरोनाचा आजाराची गंभीर परिस्थिती बघता रुग्णांना योग्य औषधोपचार मिळावा, यासाठी महिन्यातून एक दिवस खासगी डॉक्‍टरांची सेवा घेण्याचे ठरविले आहे. पुढील तीन महिन्यांपर्यंत ही सेवा असेल.

हेही वाचा: 'महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती, पण मोदी लावणार नाहीत'

चंद्रपूर मनपा हद्दीतील जवळपास 75 जनरल फिजिशियनची नाव यासाठी निश्‍चित केली आहे. त्यांनी कोणत्या दिवशी सेवा द्यायची याचे वेळापत्रकसुद्धा ठरले आहे. त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी यांनी पत्रसुद्धा पाठविले.17 एप्रिल 2021 सेवा देण्याचा पहिला दिवस होता. मंगळवार चवथा दिवस. मात्र, याकाळात एकाही खासगी डॉक्‍टरने येथे सेवा दिली नाही. 17 एप्रिलला डॉ. कैलाश मेहरा यांना वेळापत्रकानुसार आणि मंगळवारला डॉ. राम कुंभारे यांना सेवा द्यायची होती. मात्र, या दोघांची वयोमर्यादा जास्त आहे. डॉक्‍टरांची निवड करताना प्रशासनाने कुठलेही गांभीर्य दाखविले नाही. केवळ शासकीय सोपस्कार म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ही पत्र पाठविली आहेत. सोबतच खासगी डॉक्‍टरसुद्धा येथे सेवा देण्यात फारसे उत्सुक नाही. काहींना अद्याप पत्र मिळाले नाही. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यात असाच प्रयोग जिल्हा प्रशासनाने केला. त्याला चांगला प्रतिसाद खासगी डॉक्‍टरांनी दिला आहे. चंद्रपुरात मात्र उदासीनता दिसून येत आहे. कोरोनाच्या रुग्णांवरील उपचाराची दिशा जवळपास ठरलेली असते. त्यामुळे येथे सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांना फारसे वेगळे करण्याची गरज नाही. त्यांच्या सेवेने अनेकांचे जीव मात्र वाचू शकतात. यातील अनेक डॉक्‍टर खासगी कोविड सेंटरमध्ये 'कमिशन' तत्त्वावर सेवा देत आहे. त्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा देण्यात फारसा रस नाही.