संतापजनक! खासगी रुग्णालयात मिळेना उपचार: तब्बल ३ रुग्णालयांमधून परतल्यावर वृद्धाचा मृत्यू

दीपक फुलबांधे
Tuesday, 8 September 2020

लाला लजपतराय वॉर्डातील सुखदेवजी बोरकर यांना दम्याचा त्रास होता. सोमवारी श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने मुलगा व त्याच्या मित्राने उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणले.

भंडारा : कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे सर्वच कामांमध्ये मर्यादा आल्या आहेत. मात्र, खासगी डॉक्‍टरांकडून रुग्णांवर उपचार होत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. लाला लजपतराय वॉर्डातील सुखदेव बोरकर यांची प्रकृती बिघडल्याने तीन खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तेथे उपचार न मिळाल्याने शेवटी सायंकाळी सामान्य रुग्णालयात उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

लाला लजपतराय वॉर्डातील सुखदेवजी बोरकर यांना दम्याचा त्रास होता. सोमवारी श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने मुलगा व त्याच्या मित्राने उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणले. तपासणी करून डॉक्‍टरने त्यांच्याकडे ऑक्‍सिजन सिलिंडर नसल्याचे सांगून पाठवले. 

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

त्यानंतर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर आणखी एका खासगी रुग्णालयात नेले असता रिपोर्ट पाहून डॉक्‍टरांनी 75 टक्के ब्लॉकेज असल्यामुळे दोन ते तीन दिवसांवर रुग्ण राहणार नाही, असे सांगितले मात्र, तत्काळ कोणतेही उपचार केले नाही. त्यांच्याकडेसुद्धा ऑक्‍सिजन सिलिंडरची अडचण होती. दिवसभर श्री. बोरकर यांना श्‍वास घेण्यास खूप त्रास होत होता. मात्र, खासगी रुग्णालयांत इथूनतिथे जावे लागत होते. शेवटी त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले.

रुग्णालयात गोंधळ

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात श्री. बोरकर यांना आणले. तेव्हा तेथे कोरोना रुग्णांच्या वॉर्डात योग्य सोयीसुविधा नसल्याची तक्रार करणाऱ्यांची गर्दी झाली होती. रुग्ण व त्यांचे नातेवाईक डॉक्‍टरांना घेराव करण्याच्या पवित्र्यात होते. तेव्हा श्री. बोरकर यांच्या सोबत असलेला मुलगा व त्याच्या मित्राने आधी उपचार करू द्या अशी विनंती केली. तेव्हा संतप्त रुग्णांचा रोष कमी झाला. मात्र, त्यामुळे उपचारासासाठी 10 मिनिटांचा उशीर झाला. यातच श्री. बोरकर यांचे निधन झाले. कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळाला असता तर, वडिलांचा जीव वाचला असता अशी खंत संजय बोरकर याने व्यक्त केली आहे.

महत्त्वाची बातमी - धक्कादायक! नातेवाईकांनी शेवटच्या क्षणी चेहरा दाखवण्याची केली मागणी; अन प्लॅस्टिक बाजूला करताच...

तोडफोड व धमकी

जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी काही लोकांनी कोविड वॉर्डात जाऊन डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून तोडफोड केल्याचे व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल झाले आहेत. येथील डॉक्‍टर व कर्मचारी आपल्या जिवावर उदार होऊन सेवा करत आहेत. अशावेळी माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे सुरेश धुर्वे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private hospital rejects the corona patient in bhandara