esakal | यवतमाळच्या खासगी हॉस्पिटलची देशभक्ती; पुलवामात तैनात असलेल्या सैनिकाच्या मातोश्रीवर मोफत उपचार

बोलून बातमी शोधा

soldier
यवतमाळच्या खासगी हॉस्पिटलची देशभक्ती; पुलवामात तैनात असलेल्या सैनिकाच्या मातोश्रीवर मोफत उपचार
sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : कोरोनाचा कहर वाढल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. माणुसकी परागंदा झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. खासगी कोविड रुग्णालये लूट करीत असल्याची ओरड होत आहे. सामान्यांना सरकारी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. अशास्थितीत येथील एका खासगी रुग्णालयाने देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या एका सैनिकाच्या मातोश्रींवर कोवीडचे मोफत उपचार करून देशभक्तीचा परिचय दिला आहे.

हेही वाचा: नागरिकांनो, वर्धा जिल्ह्यातील बॅंकाच्या वेळा बदलल्या; दुपारी 2 वाजेपर्यंतच चालणार कामकाज

दारव्हा तालुक्‍यातील जांभोरा येथील निखिल बागोकर हा जम्मू कश्‍मिरमध्ये पुलवामा येथे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चिंताजनक कोरोनाचा संसर्ग पसरत चालला आहे. निखिलच्या आईला श्‍वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तत्काळ उपचार करता यावे, यासाठी नातेवाइकांची लगबग सुरू झाली. आईच्या प्रकृतीची माहिती पुलवामा येथे असलेल्या निखिलला देण्यात आली.

त्याने यवतमाळ येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रूमशी संपर्क साधला. तेथे कार्यरत पोलिस निरीक्षक धावडे यांनी सूत्रे हलविली. दरम्यान, वर्धा येथे कोविड इन्चार्ज असलेले डॉ. अक्षय जवेरी व प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती मदतीला धावून आले. खासगी रुग्णालयात बेडबाबत नकार मिळत असताना, साईश्रद्घा हॉस्पिटलचे संचालक विपिन चौधरी यांच्याशी संपर्क साधला. सैनिकाच्या आईला बेड हवा, म्हणून कशीबशी व्यवस्था करण्यात आली.

डॉ. विजय मून यांनी केलेल्या उपचारामुळे निखिलच्या आईच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा झाली. रविवारी (ता.18) त्यांच्या आईला सुटी देत असल्याबाबत निखिलला कळविण्यात आले. त्याने विपिन चौधरी यांच्याकडे बिल किती झाले, अशी विचारणा केली. डॉ. विजय मून, पूजा मून आणि चौधरी यांनी एक रुपयादेखील घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला.

बिलच बनविण्यात आले नाही, त्यामुळे किती माफ केले, हे देखील कळू शकले नाही. सैनिक आपल्या जिवाची पर्वा न करता सीमेवर लढत आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही घरी सुरक्षित आहोत. खासगी रुग्णालयाने कोविड संकटाच्या काळात देशभक्तीचा दिलेला संदेशही लाखमोलाचा ठरणारा आहे.

हेही वाचा: दादागिरी करणाऱ्या दबंग तरूणीचा भर चौकात खून; नागपुरातील थरकाप उडवणारी घटना

आईच्या उपचारासाठी बेड मिळत नसल्याने मी हतबल झालो होतो. डॉ. अक्षय जवेरी, प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, पोलिस निरीक्षक धावडे मदतीला धावून आले. डॉ. विजय मून यांनी केलेल्या उपचारामुळे आईच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मी पूर्ण बिल देण्यास तयार असतानादेखील विपिन चौधरी व मून डॉक्‍टर दांपत्यांनी बिल घेण्यास नकार दिला.

-निखिल बागोकर सैनिक, पुलवामा.

संपादन - अथर्व महांकाळ