ग्रामसभेच्या आत्मनिर्भयतेला धक्का; आर्थिक व्यवहार गोठवल्याने निर्माण झाल्या या समस्या

file photo
file photo

गडचिरोली : कोरोनाच्या संकटात गरजूंना अन्नधान्याचे वाटप करणे ग्रामसभांना भोवले. कोरची तालुक्‍यातील 17 व कुरखेडा तालुक्‍यातील 3 अशा एकूण 19 ग्रामसभांचे प्रशासनाने आर्थिक व्यवहार गोठवले आहेत. ऐन तेंदूपत्ता हंगामात प्रशासनाकडून कारवाई करण्यात आल्याने ग्रामसभेच्या आत्मनिर्भयतेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे तेंदूपत्ता मजुरांची मजुरी व बोनस वाटपाची समस्या भेडसावणार आहे. 

वनहक्क कायदा 2006 नियम 2008 व सुधारित नियम 2012 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अनुसूचित क्षेत्रातील अनेक ग्रामसभांना सामूहिक वनहक्कअंतर्गत अधिकार अभिलेख जोडपत्र 3 मिळाले आहेत. त्यानुसार 24 डिसेंबर 2012 ला जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून ग्रामसभांनी आर्थिक व्यवहारासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते उघडले. त्यानंतर 2017 पासून ग्रामसभा तेंदूपत्त्याचा लिलाव स्वतंत्रपणे करून त्यातून मिळालेला महसूल बॅंक खात्यात जमा करतात. याशिवाय वनोपज मोहा, हिरडा, बेहडा, धान खरेदी ग्रामसभेमार्फत करून विक्री करतात. या व्यवहारातूनही ग्रामसभेला आर्थिक फायदा होत आहे. 

सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामस्थांना रोजगार नाही. हातात पैसे नसल्याने आर्थिक समस्या भेडसावत होती. प्रशासनाकडून केवळ स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ मिळालेले होते. त्यामुळे कोरची तालुक्‍यातील 3 ग्रामसभांनी गावातील सर्व सदस्यांना मदत करण्याच्या हेतूने दीड महिना पुरेल एवढा किराणा माल, मास्क व सॅनिटायझर खरेदी करून त्याचे वाटप केले. त्यानंतर संबंधित किराणा दुकानदारांना ग्रामसभांनी धनादेश दिले असता ते परत आले. त्यामुळे ग्रामसभेने बॅंकेत चौकशी केली असता कोरचीमधील 16 व कुरखेडा तालुक्‍यातील 3 ग्रामसभेचे बॅंक खाते सील करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, यासंदर्भात कुठलीही माहिती किंवा पत्रव्यवहार प्रशासनाने ग्रामसभांकडे केला नाही, असा आरोप महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडूराम हलामी यांनी केला आहे. 

आठवडाभरापूर्वीच ग्रामसभांनी तेंदू संकलन व विक्रीचे करारपत्र केले असून हे सर्व व्यवहार ग्रामसभांच्या बॅंक खात्यावर अवलंबून असल्यामुळे ग्रामसभा पदाधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात सर्वत्र तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम सुरू झाले असून ग्रामीण आदिवासी जनतेसाठी हाच रोख उत्पन्न मिळवण्याचा स्रोत आहे. मात्र, बॅंक व्यवहार बंद पडल्याने कोरची व कुरखेडा तालुक्‍यातील 19 ग्रामसभा आर्थिक संकटात सापडल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. 

कोरची तालुक्‍यातील काही ग्रामसभांची बॅंक खाते सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने आम्हाला दिले होते. त्या आदेशावरून आम्ही कारवाई केली. 
-श्री. मुक्तेश्‍वर , शाखा व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया, कोरची. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com