esakal | कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात समस्यांचे विघ्न
sakal

बोलून बातमी शोधा

कळमेश्‍वर ः रुग्णांना विचारपूस करताना आमदार सुनील केदार व कार्यकर्ते.

कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात समस्यांचे विघ्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमेश्वर (जि.नागपूर)   रुग्णालयातील वाढत्या समस्या बघता याबाबतच्या तक्रारी स्थानिक पत्रकारांनी आमदार सुनील केदार तसेच आरोग्य संचालकांकडे केल्या होत्या. या गंभीर तक्रारींची दखल घेत आमदार सुनील केदार यांनी रविवारी (ता.1) सकाळी नऊ वाजता ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. आमदार केदारांकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारीचे गाऱ्हाणे मांडताच यावर संताप व्यक्त करत आमदारांनी कर्मचाऱ्यांना खडसावले.
संबंधित तक्रारीची दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोन करून 9 सप्टेंबरला विस्तृत तक्रारींच्या अहवाल सादर करण्यास सांगितले. सध्या कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले असून येथे मंजूर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. रुग्ण कल्याण समितीची बैठक नाही. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अमरीश मोहब्बे पूर्णवेळ हजर नसतात. रुग्णालयातील जुना वॉटर प्युरिफायर सुव्यवस्थित नसून नवीन वॉटर कुलर बंद पडला आहे. रुग्णांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शवविच्छेदन रूममध्ये असलेला "फ्रिझर' बंद असून मृतदेह ठेवण्यासाठी गैरसोय निर्माण होत आहे. या रूममध्ये पंखा, लाईट आणि पाण्याची व्यवस्था नाही. सध्या रुग्णालयात एकच अटेंडेंट कार्यरत असून एक मेडिकल सुटीवर, एक पद रिक्त, एकाला डेपूटेशनवर मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे एकाच अटेंडंटवर पूर्ण ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी आहे. दवाखान्यामध्ये बहुतांश औषधी उपलब्धच राहत नाही. रुग्णालयात सोनोग्राफी होत नसल्याने रुग्णांना खासगी डॉक्‍टरांकडे जाऊन जास्तीचे पैसे खर्च करून सोनोग्राफी करावी लागते. रुग्णांकरिता असलेल्या शौचालयात नळाची आणि पाण्याची व्यवस्था नाही. ओपीडीची वेळ सकाळी 8 ते 12 असताना ओपीडी 9 वाजता सुरू करून लवकर बंद केल्या जाते. ऍम्बुलन्स सतत नादुरुस्त असल्याने रुग्णांना खासगी रुग्णवाहिकेकडे पाठविल्या जाते. या भोंगळ कारभाराची दखल घेऊन आमदार सुनील केदार यांनी रविवारी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. आमदार केदार यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, माजी पं. स. सदस्य वैभव घोंगे, खरेदी-विक्री अध्यक्ष बाबाराव कोढे, कृउबास सभापती बाबाराव पाटील, न. प. उपाध्यक्ष ज्योत्स्ना मंडपे, शिक्षण सभापती वनिता भलावी, माजी सं. गां.नि.यो.अध्यक्ष अरविंद रामावत, राजेंद्र सुके, विलास मानकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

loading image
go to top