
भद्रावती शहरातील सोनुर्ली, चिंतामणी, विंजासन, खडकी, लोंढाळा तलाव परिसरात वायगाव हळदीचे उत्पादन पूर्वी मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे. वायगाव हळद ही इतर सामान्य हळदीपेक्षा अधिक दर्जेदार समजली जात असल्याने या हळदीला संपूर्ण विदर्भातून मोठी मागणी आहे.
भद्रावती (जि. चंद्रपूर) : संपूर्ण विदर्भात आपल्या विशेष दर्जामुळे प्रसिद्ध असलेल्या भद्रावतीच्या वायगाव हळदीवर यावेळी संक्रांत आली आहे. या हळदीचे उत्पादन क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने हळदीच्या उत्पादनात घट होत असल्याची माहिती येथील हळद उत्पादक तथा व्यापारी भारत नागपुरे यांनी दिली आहे. शिवाय या पिकाच्या उत्पादनासाठी येत असलेला खर्च व मेहनतीच्या तुलनेत मिळणारा आर्थिक लाभ फारसा नाही. त्यामुळे हळद उत्पादकांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे.
भद्रावती शहरातील सोनुर्ली, चिंतामणी, विंजासन, खडकी, लोंढाळा तलाव परिसरात वायगाव हळदीचे उत्पादन पूर्वी मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे. वायगाव हळद ही इतर सामान्य हळदीपेक्षा अधिक दर्जेदार समजली जात असल्याने या हळदीला संपूर्ण विदर्भातून मोठी मागणी आहे. फिरते व्यापारी हळद निघाल्यानंतर भद्रावतीला येऊन हळद उत्पादकांशी संपर्क साधून व दरासाठी वाटाघाटी करून हळद खरेदी करतात.
स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही हळदीची खरेदी केली जाते. नागपूरवरूनच ही हळद विविध शहरातील व्यापारी, सौंदर्य प्रसाधन कंपन्या यांना पुरविण्यात येतात. सध्या बाजारात हळदीला २० ते २५ हजार रुपये प्रतिक्किंटल भाव मिळतो. ज्या भागात हळदीचे पीक घेतले जायचे, ती जागाच आता उद्योगांसाठी संपादित करण्यात आली. त्याचप्रमाणे शहराचा व्यापही दिवसेंदिवस सारखा वाढत असल्यानेही शेतीच्या उत्पादनाखाली असलेला भूभाग कमी झाला आहे.
त्यामुळे सहाजिकच हळद शेतीचे क्षेत्र घटले आहे. कृषी सेवा केंद्रांमधून हळदीची कोणतीही बिजाई मिळत नाही. निघणाऱ्या हळदीपैकी बिजाईसाठी आवश्यक असलेली हळद वेगळी काढून ठेवून तिला एखाद्या झुडपाखाली थंडावा असलेल्या ठिकाणी पुरून वर्षभर सांभाळून दुसऱ्या वर्षी बिजाईसाठी वापरावी लागते. यादरम्यान, काही हळद नष्ट होऊन बिजाई कमी होते.
हळदीची पेरणी जून महिन्यात करण्यात येते. यासाठी कोणतेही यंत्र उपलब्ध नसल्याने ती केवळ मजुरांकडूनच करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. साधारणतः फेब्रुवारी महिन्यात ती खोदून बाहेर काढण्यासाठीही मजुरांचीच मदत घ्यावी लागते. एवढ्यावरच हळदीचे उत्पादन हातात येत नाही. काढलेल्या हळदीला गरम पाण्यात उकळून, वाळवून तिला घासल्यानंतरच हळद विक्रीसाठी तयार होते. या शेवटच्या प्रक्रियेसाठी उत्पादकांना खूप मोठा खर्च येतो. अशा अवस्थेत बाजारपेठेत हळदीचे भाव पडल्यास उत्पादकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो.
खर्च जादा उत्पादन कमी
पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जायची. आता अनेकांनी हळदीचे पीक घेणे बंद केले. हळदीपासून बऱ्यापैकी नफा मिळत होता. मात्र, गेल्या काही वर्षात उत्पादनाचा खर्च वाढला. त्या तुलनेत उत्पन्न कमी हाती येत आहे.
भारत नागपुरे, हळद उत्पादक, भद्रावती.
संपादन : अतुल मांगे