खादीच्या कापडापासून फॅशनेबल वस्त्रांची निर्मिती, २४६ महिला चालवतात सोलर खादी प्रोसेसिंग युनिट

सुरेंद्र चापोरकर
Sunday, 18 October 2020

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापसापासून सूत कातणे तर खादीचे वस्त्र तयार करण्यापर्यंतची ही चळवळ एक-दोन दिवसांत उभी राहिली नाही. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे या लढ्याचे खरे नायक.

अमरावती : सध्याच्या ब्रॅण्डेड कपड्यांच्या काळात पारंपरिक खादी वस्त्र मागे पडत असल्याचे बोलले जाते. मात्र, प्रत्यक्षात महिलाशक्तीने प्रवाहाविरुद्धचा लढा सक्षमपणे लढत प्रचंड झेप घेतली आहे. विदर्भ किंवा महाराष्ट्र नव्हे तर सोलर खादी प्रोसेसिंग हा संपूर्ण देशातील एकमेव प्रकल्प आहे. महिलाशक्ती काय करू शकते हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी दाखवून दिले आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापसापासून सूत कातणे तर खादीचे वस्त्र तयार करण्यापर्यंतची ही चळवळ एक-दोन दिवसांत उभी राहिली नाही. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे या लढ्याचे खरे नायक. खादीच्या प्रसार व प्रचारासाठी त्यांनी सुरुवातीला ग्रामीण भागात सोलर चरख्याची संकल्पना राबविली. महिलांना त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने पुढचा टप्पा गाठण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, त्यात अनेक अडथळे येत होते. असे असतानाही मागे हटायचे नाही, असा ठाम निर्धार महिलांनी केला व कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या माध्यमाने पुढचा टप्पा गाठण्यात आला. कस्तुरबा समितीच्या माध्यमातून 246 महिला एकत्र आल्या व त्यांनी ही चळवळ पुढे नेली. 

हेही वाचा - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

तयार करण्यात आलेले सूत दुसऱ्याला देण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून त्यापासून कापड व वस्त्र तसेच अन्य वस्तू तयार करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे आवश्‍यक असल्याने अमरावतीच्या एमआयडीसी भागात ग्रीन फॅब सोलर खादी प्रोसेसिंग क्‍लस्टर प्रा. ली. कंपनीची स्थापना करण्यात आली. सामूहिक सुविधा केंद्र म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. या केंद्राच्या उभारणीने कापसापासून तर फॅशनपर्यंतच्या साखळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. विशेष म्हणजे अशा स्वरूपाचे विकेंद्रित केंद्र फक्त अमरावतीतच आहे. विकेंद्रीकरणामुळे शेकडो लोकांना कमी पैशात रोजगार उपलब्ध झाला. खादीच्या कापडापासून फॅशनेबल वस्त्रांच्या निर्मितीसाठी नागपूरच्या निधी गांधी यांची मदत घेण्यात आली. लहान मुलांच्या कपड्यापासून तर रूमाल, गृहसजावटीच्या वस्तू, पुरुषांचे शर्ट, कुर्ते असे 25 ते 30 प्रकारचे प्रॉडक्‍ट आता तयार होत आहेत. अर्थात या सर्व वस्तू विविध ठिकाणी तयार होतात. 

खादी ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम, खादी व ग्रामोद्योग आयोग, जिल्हा उद्योग केंद्र अशा विविध यंत्रणांच्या मदतीने हा प्रकल्प उभाण्यात आला आहे. 

हेही वाचा - आई- वडील नाही मुलांचे बना मित्र! जाणून घ्या...

ऑर्गेनिक खादी -
जिल्ह्यातील सुमारे शंभर शेतकरी या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. ही सर्व मंडळी ऑर्गेनिक कापूस पिकवितात. त्यांच्याकडून कापूस विकत घेतला जातो व त्यातून ऑर्गेनिक खादी कापड तयार केले जाते. विशेष म्हणजे या कापडाला नैसर्गिक फुले तसेच वस्तूंनीच रंग दिला जातो. त्यामुळे कोणत्याही रसायनाचा वापर या कापडात नाही. कापडाला रंग लावल्यावर वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणासुद्धा येथे लावण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याची काळजीसुद्धा घेतली जाते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Production of fashionable garments from khadi cloth by 246 woman in amravati