esakal | बदनाम वस्तीतल्या रात्रीही आता अंधारलेल्या; पाण्याच्या घोटांवर सरताहेत त्यांचे दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

chd

महाकाली मंदिराच्या परिसरात गौतमनगर आहे. तीस-चाळीस देहविक्री करणाऱ्या महिलांची ही वस्ती. बहुतांश महिला, मुली तेलंगणाच्या. काही महिन्यांसाठी येथे दलालामार्फत यायचे. "धंदा' करायचा आणि गाठीला चार पैसे घेऊन गावाला जायचे. अर्धे पैसे मालकिणला आणि अर्धे तिला मिळायचे. परंतु, कोरानाचे सावट याही "धंद्या'वर पडले.

बदनाम वस्तीतल्या रात्रीही आता अंधारलेल्या; पाण्याच्या घोटांवर सरताहेत त्यांचे दिवस

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : गौतमनगर... एक बदनाम वस्ती. या वस्तीत सूर्य मावळतीला गेला की मोगऱ्यांच्या फुलांचा गंध हवेत दरवळायचा. दु:ख, वेदना रंगरंगोटीने लपवून गिऱ्हाकाईंची वाट बघत झोपडीवजा घरासमोर "त्या' उभ्या असायच्या. त्यांच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी आसुसलेले "नर' तिथे "मादी'च्या शोधात  फिरायचे. आता येथे शुकशुकाट आहे. कोराना आला. टाळेबंदी लागली आणि ही वस्तीही सुनसान झाली आणि एक वेळच्या जेवणाचीही वानवा झाली. सध्या गिऱ्हाईक फिरकत नाही. घरात पैसा नाही. त्यामुळे ज्या खोलीत "धंदा' सुरू आहे. त्याचे भाडे द्यायचे कसे? असा प्रश्‍न "त्यांच्या' समोर आहे.
महाकाली मंदिराच्या परिसरात गौतमनगर आहे. तीस-चाळीस देहविक्री करणाऱ्या महिलांची ही वस्ती. बहुतांश महिला, मुली तेलंगणाच्या. काही महिन्यांसाठी येथे दलालामार्फत यायचे. "धंदा' करायचा आणि गाठीला चार पैसे घेऊन गावाला जायचे. अर्धे पैसे मालकिणला आणि अर्धे तिला मिळायचे. परंतु, कोरानाचे सावट याही "धंद्या'वर पडले. सर्वत्र टाळेबंदी झाली. नाकेबंदी लावली. त्याउपरही शरीराचे लचके तोडण्यासाठी हपापलेल्यांचे पाय या वस्तीकडे भटकतच होते. मात्र, या महिलांनीच "धंदा' बंद करण्याचा निर्णय घेतला. "हमारा क्‍या है... लेकिन यहॉं आनेवाले के बालबच्चे है' असे रुचा (नाव बदललेले) सांगत होती. 35 वर्षांची रुचा. 13 वर्षांची असताना तेलंगणातून येथे आली. दलालाने तिला पन्नास हजारात विकले. पंधरा वर्षांपूर्वी तिची पोलिसांनी सुटका केली. तिला तिच्या मूळ गावी नेले. परंतु, आईने ओळख दाखविली नाही. "हमारे समाज मे.. हम जैसे लोक को नही रखते' एवढेच ती बोलली आणि विषय टाळला. या नरकात ती पुन्हा परतली. तिला एक मुलगा आहे. त्याचा बाप कोण? तिला माहित नाही. एकाने त्याचे पितृत्व स्वीकारले. तो आणि मुलगा वस्तीपासून दूर गेला. मुलगा सातव्या वर्गात आहे. त्याचा कथित बाप आणि मुलाचा खर्च तिलाच भागवावा लागतो. दहा बाय दहाची तिची खोली. भकास, रंग उडालेला. घरावर तुटलेले कवेलू. आत एक दिवा. गादी, गॅस आणि पाणी पिण्यासाठी एक भांडे. एवढीच तिची संपत्ती. सध्या घरात एक पैसा नाही. सकाळी पोलिस जेवण आणून देतात. त्यावरच जगणे सुरू आहे. रात्री पाणी पिऊनच झोपावे लागते. दोन दिवसांपूर्वी तिच्या डोक्‍यात प्रचंड वेदना झाल्या. घरात दहा रुपये नव्हते. पोलिसांनीच "गोळी' आणून दिली. खोलीचे भाडे पाच हजार रुपये. आता धंदा बंद आहे. घरभाडे आणि मुलाच्या शाळेची "फी' द्यायची कशी, या चिंतेत ती आहे.

सविस्तर वाचा - कोरोना पाठोपाठ विदर्भात या आजारानेही काढले डोके वर; मेडिकलमध्ये एकाचा बळी                                                                                घरमालकाचा भाड्यासाठी तगादा                                                        वस्तीतील बहुतांश महिला, मुली भाड्याच्या घरात राहतात. घरमालकाचा भाड्यासाठी तगादा सुरू आहे. प्रत्येकाला भाड्याची चिंता सतावत आहे. "सरकार पैसा दे रहे है. लेकिन हमे नही मिलता", असे गीता म्हणाली. तिने जनधन योजनेबाबत कुठेतरी ऐकले. मात्र, प्रत्येक गिऱ्हाईकासाठी नवे नाव आणि नवी ओळख. त्यामुळे शासन दरबारी येथील महिला अनोळखीच आहेत. हाडामासांची माणसे असतानाही "त्या' विजनवासातच जगतात. त्यांच्याकडे आधार नाही, रेशन कार्ड नाही. या वस्तीतील प्रत्येकाची कहाणी काळजाला घरे पाडणारी आहे. मात्र, रोजच्या वेदना आणि दु:खाने त्यांचे अश्रूही आटले आहेत. आता दिवस आणि रात्र त्यांच्यासाठी सारखीच आहे. चारचौघी मिळून जमिनीवर रेघोट्या पाडून एखादा खेळ खेळत, हसत खिदळत एकमेकींचे दु:ख वाटून घेत आहेत. "लॉकडाऊन'संपेल आणि पुन्हा या वस्तीत झगमगाट होईल, याची येथील प्रत्येकालाच प्रतीक्षा आहे...

loading image