रस्त्यावरील खड्ड्यात का लावले बेशरमाचे झाड? वर्ध्यात समता सैनिक दलाचे अभिनव आंदोलन

मनोज रायपुरे
Tuesday, 29 September 2020

विक्रमशीलानगराकडे जाणारा हा रस्ता अरुंद आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे उगवली असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून राहते. रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे व साचलेल्या पाण्यातून वाट कशी काढावी, असा प्रश्न येथील नागरिक व वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे.

वर्धा : सिंदी मेघे, बहुजननगर ते थूल-ले-आउट या विक्रमशीलानगराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. गेल्या १० वर्षांपासून या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाच्या डांबरीकरणाकडे संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिक व या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहनचालकांनी केली आहे.

त्यामुळे समता सैनिक दल शाखा भीमवाडीतर्फे समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या नेतृत्वात रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमची झाडे लावून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

सिंदी मेघे, बहुजननगर ते थूल-ले-आउटकडे जाणाऱ्या या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. हे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत.

साचलेल्या पाण्यातून काढावी लागते वाट

विक्रमशीलानगराकडे जाणारा हा रस्ता अरुंद आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे उगवली असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून राहते. रस्त्याला जणू पुराचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे व साचलेल्या पाण्यातून वाट, कशी काढावी, असा प्रश्न येथील नागरिक व वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे.

बांधकाम विभाग झोपेत

या मार्गाने नेहमी वाळू व गिट्टी भरलेल्या जड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची चाळणी झालेली आहे. रस्त्याची दुरवस्था होऊनही बांधकाम विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असून त्यांच्या भावनेचा उद्रेक होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी, ये-जा करण्यासाठी आवश्‍यक २० फूट रुंदीच्या रस्त्याचे तातडीने बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकानी केली आहे.

अवश्य वाचा :  पेट्रोलपंप मालकाने केला कडक नियम, ‘नो मास्क नो पेट्रोल’!

समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या नेतृत्वात समता सैनिक दल वॉर्ड शाखा भीमवाडी यांच्या सहकार्याने आसपासच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यात बेशरमची झाडे लावून आंदोलन केले. यावेळी समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मार्शल रमेश निमसडकर, समता सैनिक दलाचे जिल्हा संरक्षण विभागप्रमुख प्रदीप कांबळे, धर्मपाल कांबळे, दिलीप वैद्य, विजय डंभारे, रोशन गायकवाड, अक्षय घुसे, मधुर येसनकर, अशोक ताकसांडे, महासचिव स्वप्नील कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत, गौतम देशभ्रतार, प्रतीक मेश्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाणून घ्या : हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज  

अपघातांत मोठी वाढ

पाण्यामुळे खड्डे किती खोल आहेत, याचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. अनेक वाहनचालक घसरून पडल्याचे प्रकार समोर आले आहेत. नागरिकांना जाणे-येणे करण्यासाठी हाच रस्ता सोयीचा आहे. परंतु पाणी भरलेल्या खोल खड्ड्यातून नागरिकांना जीव मुठित घेऊन वाट काढावी लागते; तर दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest administration by planting a besharam tree in the pit