एटापल्लीत संचारबंदीचे उल्लंघन करणे व्यापाऱ्यांना भोवले...16 जणांवर दंडात्मक कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

एटापल्ली येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाइन केलेले 10 जण कोरोनाबाधित आढळून आले. ते सर्वजण मुंबई येथून प्रवास करून आले होते. 2 जूनला शहरातील अनेक दुकाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू होती. याबाबतची माहिती मिळताच नगरपंचायत मुख्याधिकारी अजय साळवे यांचे नेतृत्वातील पथकाने प्रत्यक्ष दुकानात जाऊन दुकानदारांवर पाचशे रुपयाची दंडात्मक कार्यवाही करून यापुढे नियमाचे उल्लंघन न करण्याची तंबी दिली.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकान सुरू ठेवणाऱ्या एटापल्ली येथील व्यापाऱ्यांना चांगलेच महागात पडले. कोरोना संसर्ग विरोधी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी (ता. 2) एकाच दिवशी 16 जणांवर नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही केली. त्यांच्याकडून प्रती दुकानदार पाचशे रुपये वसूल करण्यात आले.

 

एटापल्ली येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाइन केलेले 10 जण कोरोनाबाधित आढळून आले. ते सर्वजण मुंबई येथून प्रवास करून आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कता बाळगली जात आहे. 2 जूनला शहरातील अनेक दुकाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू होती. याबाबतची माहिती मिळताच नगर पंचायत प्रशासनाचे पथक बाजारपेठेत पोहोचले. त्यांनी अनेक दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही केली.

 

या दुकानांवर दंडात्मक कार्यवाही

यात नगरपंचायत सदस्य दीपक सोनटक्‍के यांचा मुलगा दिनेश सोनटक्‍के यांचे श्रीराम एंटरप्राइजेस, व्यापारी संघटना अध्यक्ष मधुसूदन कंकडालवार यांचे बालाजी किराणा स्टोअर्स, व्यापारी संघटना युवा अध्यक्ष महेश पुल्लूरवार यांचे साई स्टील सेंटर, तसेच इतर व्यापाऱ्यांचे लकी मोबाईल शॉप, बिकानेर स्वीट मार्ट, संजय ज्वेलर्स, अनुप्रिया क्‍लॉथ, सुनीता जनरल,जगदीश किराणा, दातादयालु किराणा, अंकित जनरल, सुब्रत जनरल, गजानन हमंद यांचे भाजीपाला, सुनील खोब्रागडे यांचे भाजीपाला, शुभांगी लेनगुरे यांचे भाजीपाला दुकान, व राज ड्रेसेस अशा सोळा दुकानदारांचा समावेश आहे. त्यांनी सकाळी आठ वाजता आपली दुकाने सुरू केली; मात्र दुपारी चारनंतरही ती सुरू असल्याचे आढळून आले. दुकाने सायंकाळी चारनंतर बंद करण्याच्या सूचना प्रशासनाकडून वारंवार देण्यात आल्या होत्या. असे असतानाही बाजारपेठेतील अनेक दुकाने सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

नगरपंचायतने दिली ताकीद

याबाबतची माहिती मिळताच नगरपंचायत मुख्याधिकारी अजय साळवे यांचे नेतृत्वातील पथकाने प्रत्यक्ष दुकानात जाऊन दुकानदारांवर पाचशे रुपयाची दंडात्मक कार्यवाही करून यापुढे नियमाचे उल्लंघन न करण्याची तंबी दिली. संचारबंदीचे उल्लंघन केलेल्या व्यापाऱ्यांच्या यादीत काही मोठ्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. नगरपंचायत प्रशासनाने नियम मोडणाऱ्या कोणत्याही व्यापारी व नागरिकांची गय केली जाणार नाही, अशी ताकीद दिली आहे. नगरपंचायत प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा : राजाने बांधले क्रीडांगण, लोकांनी केला त्याचा बाजार! एका ही कहाणी...

ग्रामीण भागात होतेय नियमाचे उल्लंघन

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दुकाने सुरू ठेवण्यासाठी वेळ ठरून दिलेली आहे. मात्र, या नियमाचे ग्रामीण भागात सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. काही व्यापारी दुकानाच्या मागच्या दाराने व्यवहार करीत असल्याच्याही तक्रारी पुढे आल्या आहेत. सुरक्षित अंतर, मास्क न वापरताही ग्राहक दुकानात गर्दी करून जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करीत असल्याने कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punitive action against 16 traders violating curfew in etapalli