esakal | सावधान! गडचिरोलीत विलगीकरणातील महिलेचा मृत्यू, पाचजण पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Gadchiroli Hospital

रविवार (ता.17) आणि सोमवार (ता.18) हे दोन दिवस या जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरले. बाहेर राज्यातून जिल्ह्यात दाखल झालेल्या मजुरांचे वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण करण्यात आले होते. त्यावेळी त्या सर्वांची कोरोना चाचणी करून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

सावधान! गडचिरोलीत विलगीकरणातील महिलेचा मृत्यू, पाचजण पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जीवघेण्या कोरोनामुळे संपूर्ण देशासह अख्खे राज्य त्रस्त असताना विदर्भातील गडचिरोली जिल्हा मात्र पूर्णतः ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, गेल्या पंधरवड्यात तेलंगणात मजुरीसाठी गेलेले शेकडो मजूर जिल्ह्यात परत आले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यापैकी पेरमिली (ता. गडचिरोली) येथे विलगीकरणात असलेली एक ५५ वर्षीय महिला रविवारी (ता.17) सकाळी मरण पावली. तसेच येवली येथील विलगीकरणातील 30 ते 40 मजूर सोमवारी सकाळी कोणालाही न सांगता पळून गेल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. त्यामुळे आरोग्य आणि जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. 

चिनमधून आलेल्या अति जहाल कोरोना विषाणूने सर्व जगाला ग्रासले असतानाच हळूच तो भारतातही शिरला आणि पाहता पाहता त्याने संपूर्ण देश व्यापला. मात्र, याला अपवाद विदर्भातील गडचिरोली जिल्हा ठरला होता. या जिल्ह्यात काल-परवापर्यंत कोरोनाबाधित एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे या जिल्ह्याला ग्रीन झोन घोषित करण्यात आले होते. मात्र, रविवार (ता.17) आणि सोमवार (ता.18) हे दोन दिवस या जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरले. बाहेर राज्यातून जिल्ह्यात दाखल झालेल्या मजुरांचे वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण करण्यात आले होते. त्यावेळी त्या सर्वांची कोरोना चाचणी करून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या चाचण्यांचा प्रथम अहवाल रविवारी (ता. 17) रात्री प्राप्त झाला. त्यात चक्क तीन जण कोरोनाबाधित आढळून आले, तर सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या दुसऱ्या अहवालात आणि दोनजण, असे एकूण पाचजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

विशेष म्हणजे पेरमिली येथील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या एका महिलेचा रविवारी, 17 मे रोजी सकाळी मृत्यू झाला होता. तिचा अहवाल अद्याप मिळायचा आहे. त्यामुळे या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल. रविवारी मिळालेले अहवाल कुरखेडा येथील दोन क्वारंटाईन सेंटरचे व चार्मोशीमधील एका क्वारंटाईन सेंटरचे आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. संबंधित रुग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशील घेणे सुरू आहे. संबंधित पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना आरोग्य विभागाकडून 16 मे रोजी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते. 
रविवारी (ता.17) सकाळी मरण पावलेली महिला 55 वर्षांची होती. ती तेलंगणा राज्यात सहकुटूंब मिरची तोडण्याच्या कामासाठी गेली होती. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यानंतर या सर्वांचा रोजगार बंद झाला. दीड महिना त्यांना कसा तरी तग धरला, मात्र त्यानंतर त्यांचे हाल होणे सुरू झाले त्यामुळे बाहेर राज्यातील मजूर वर्ग आपआपल्या गावाकडे पायदळ वा मिळेल त्या मार्गाने यायला लागला.

अवश्य वाचा- मुंबईहून वर्धेत आलं चार जणांच कुटूंब; तिघे निघाले कोरोनाबाधित

मागील पंधरवड्यात जिल्ह्यात तेलंगणातून शेकडो मजूर सहकुटूंब दाखल झाले होते. रविवारी (ता. 17) मरण पावलेल्या महिलेली महिलासुद्धा आपल्या कुटुंबासह गडचिरोली तालुक्‍यातील पेरमिली गावात दाखल झाली. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावाबाहेरील शेतात तयार केलेल्या वेगवेगळ्या झोपड्यांमध्ये संबंधित महिलेसह अनेकांना ठेवले होते. मात्र, या सर्वांची स्थानिक प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाने योग्य काळजी घेतली नाही, त्यांना आवश्‍यक सोयी-सुविधा, जेवणाची योग्य व्यवस्था केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच 12 व्या दिवशी संबंधित महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. 

विलगीकरण केलेले 30 ते 40 मजूर गेले पळून 

जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या येवली गावातील शाळेत तेलंगणातून आलेल्या शेकडो मजुरांना विलगीकरणात ठेवले होते. यातील सुमारे 30 ते 40 मजूर एकाच वेळी पळून गेले. विशेष म्हणजे जाताना त्यांनी स्थानिक प्रशासनाला याबाबत काहीच माहिती दिली नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू झाल्याने ते सर्व तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.