esakal | शिवसेनेच्या धनुष्याला आपसी वादाची कीड; व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

शिवसेनेच्या धनुष्याला आपसी वादाची कीड; व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : महाविकासआघाडीच्या सत्तेत शिवसेना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. शिवसेना इतर पक्षांना सांभाळून सत्ता सांभाळत असली तरी वर्धेत मात्र संपर्क प्रमुखांना कार्यकर्ते सांभाळणे कठीण होत असल्याचे दिसते. पक्षविस्ताराच्या मोहिमेत काही कार्यकर्त्यांना डावलल्याने भावना अनावर झाल्यांनी त्यांनी थेट संपर्क प्रमुखांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला.

पक्षात मतभेद असणे अपेक्षित आहे. परंतु. ते असे जाहीर रित्या उघड्यावर येणे म्हणजे पक्षाची त्यांच्याच कार्यकर्त्यांवरील पकड कमजोर असल्याचे द्योतक आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील संबंधाला लागलेल्या आपसी वादाच्या किडीमुळे जिल्ह्यात शिवसेनेचा धनुष्य कमजोर होऊन मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व प्रकार केवळ डावलण्याच्या प्रकारातून झाल्याचे काही शिवसैनिकांच्या बोलण्यातून पुढे आले आहे.

हेही वाचा: खासदार नवनीत राणा यांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार सुरू आहे. विस्ताराच्या नावावर जुण्यांना डावलून नव्यांना पक्षात जबाबदारी देण्याचा प्रकार सुरू झाला. वाढत असलेल्या या पक्षामुळेच हिंगणघाट येथे भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यात पक्षाचा विस्तार साधल्याचे म्हणत असताना तालुक्यातच नाही जिल्ह्यात शिवसेनेला ओळख देणारे माजी मंत्री अशोक शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसचा हात धरला. यामुळे अनेक जुने कार्यकर्ते नाराज झाले. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेचा विस्तार झाला की आणखी काय, याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करणे अपेक्षित आहे.

असाच प्रकार कारंजा तालुक्यात घडला. येथे काही जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देण्यात आली. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचे हेच फळ काय? असे म्हणत नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त करण्याची त्यांची पद्धत जरा नियमात नसली तरी बऱ्याच शिवसैनिकांनी त्याला पसंती दिल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात वाढत असलेल्या या संपर्क प्रमुखांच्या मनमर्जीला येथे जरा चाप बसेल असे त्यांच्याकडून बाहेर बोलण्यात येत आहे.

हेही वाचा: लग्नास नकार दिल्याने मुलीच्‍या काकाचा निर्घूण खून

कार्यकर्ते म्हणाले, संपर्क प्रमुखांनी ताकद ओळखावी

व्हायरल झालेल्या व्हिडिओत शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी संपर्क प्रमुखांना अर्वाच्च शिवीगाळ केली. यात जिल्ह्यात पक्ष विस्तार करताना संपर्क प्रमुखांनी ताकद ओळखावी. त्यांना अमरावतीत कोणी ओळख नाही. यामुळे ते वर्ध्यात येऊन काम करण्याचा देखावा करीत असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्ह्यात काम करताना प्रामाणिकांना ओळखा असा सल्लाही या व्हिडिओत देण्यात आला आहे.

शिवसेनेत असलेला कचरा स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेकांची ओरड होत आहे. यातील काहींकडून असा प्रकार होत आहे. या प्रकाराला शिवसेना घाबरत नाही. मी अशांची काळजी करत नाही. असा प्रकार करणारे संकुचित विचाराचे आहेत. अशांना पक्षात जागा नाही.
- अनंत गुढे, जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना
loading image
go to top