हेही वाचा... राजा बिरशाहच्या प्रेमात राणी हिराईने बांधले स्मारक 

श्रीकांत पेशटीवार 
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

> चंद्रपूर शहराला साडेअकरा किलोमीटरच्या परकोटाने वेढले 
> राणी हिराई माता महाकालीला केला होता नवस 
> वयाच्या 28 व्या वर्षी राजाचे झाले निधन 
> समाधीस्थळाच्या परिसरात अनेक वास्तू 

चंद्रपूर : प्रेमात खूप ताकद असते असे म्हटले जाते. "प्यार' या शब्दाचा पहिला अक्षर अर्धवट असला तरी तो दोन लोकांना जोडण्याचे काम करतो. प्रेमाने दुष्मनालाही जवळ करता येते असे म्हणतात. प्रेमाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आई आणि मुलाचे प्रेम हे अप्रतीम. याची बरोबरी दुसरे प्रेम करूच शकत नाही. प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम त्यांच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांचे जग कितीतरी वेगळे आहे. 

मुमताजच्या प्रेमात शाहाजहानने आग्रात ताजमहाल बांधला. एका राजाने राणीच्या प्रेमात बांधलेली वास्तू जगभरात प्रसिद्ध आहे. ही वास्तू पाहण्यासाठी जगभरातून लोक आग्रात गर्दी करीत असतात. ताजमहालचा जगातील सात अजुब्यात देखील समावेश होतो. याला प्रेमाचे प्रतीक समजले जाते.

मुमताजच्या प्रेमापोटी शाहाजहानने ही वास्तू तयार केली हे आपण सर्वांना माहित आहे. मात्र, कोणत्या राणीने राजाच्या प्रेमात अशीच वास्तू तयार केली असं म्हटले तर तुमचा विश्‍वास बसेल का? काहीही सांगता असेच काही तरी म्हणाल. मात्र, चंद्रपुरात अशीच एक वास्तू राणीने राजासाठी तयार केली आहे. चला तर माहिती करून घेऊ या कोणती वास्तू आहे ती... 

जवळपास साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहराला साडेअकरा किलोमीटरच्या परकोटाने वेढले आहे. या शहराला गोंडकालीन इतिहास आहे. इतिहासाच्या या पानापासून आजही अनेकजण अनभिज्ञ आहेत. मात्र, आता या इतिहासाची ओळख हळूहळू हेरिटेज वॉक या नव्या ट्रेण्डने बाहेर पडू लागली आहे. राणी हिराई यांचे पती गोंडराजे बिरशाह यांना पुत्र नव्हता. केवळ मुलगी होती. 

देवगडच्या राजघराण्यातील एक राजपुत्र दर्गशहा यांना मुलगी दिली. एकदा बिरशाहच्या मुलीस दुर्गशहा याने अपमानीत करून माहेरी पाठविले. तिने आईला हा प्रकार सांगितला. तेव्हा राणी हिराई क्रोधीत झाल्या. तिने राजाला आपल्या मुलीच्या अपमानाचा सूड घेण्यास सांगितले.

राणी हिराई हिनेसुद्धा माता महाकालीला नवस केला. या लढाईत विजयी झाल्यास तुला दुर्गशहाचे शीर आणून वाहीन. या युद्धात शेवटच्या क्षणी राजा बिरशहा विजयी झाले. दुर्गशहाचे शीर धडावेगळे केले गेले. हा विजय आपल्यास महाकालीच्या कृपेने मिळाला म्हणून राणी हिराई दुर्गशहाचे शीर देवीला मोठा समारंभ करून वाहिले, असा उल्लेख अ. जा. राजूरकर यांच्या चंद्रपूरच्या इतिहासात उल्लेखित आहे. 

राजास राणी हिराईपासून पुत्र नव्हता म्हणून त्यांनी दुसरे लग्न केले. मोठ्या समारंभाने लग्नाची वरात निघाली. राजा बिरशहाने हिरामण नावाच्या सैनिकाला अंगरक्षक केले होते. राजाची वरात गोंडराजाच्या राजवाड्यात आल्यानंतरच अंगरक्षकाने राजा बीरशहाला ठार केले. वयाच्या 28 व्यावर्षी राजाचे निधन झाले. काही काळानंतर राणी हिराईने राजा बिरशहा याच्या प्रेमात समाधीस्थळ बांधले. ते आजही आहे. कुण्या राणीने राजाच्या प्रेमात बांधलेली ही वास्तू एकमेव असावी. राणी हिराईने समाधीस्थळाच्या परिसरात अनेक वास्तू बांधल्या. या वास्तू चंद्रपूरसह महाराष्ट्रातील पर्यटकांना भुरळ घालत आहेत. 

बांधकामे देताहेत कार्यकाळाची साक्ष

राणी हिराईने आपल्या कार्यकाळात अनेक मंदिरासह बरीच बांधकामे केली. आजही ही बांधकामे राणी हिराईच्या कार्यकाळाची साक्ष पटवून देत आहेत. महाकाली मंदिराचे जुने देऊळ पाडून नवीन मोठे मंदिराचे बांधकाम केले. यासोबत एकवीरा मंदिर, बालाजी वॉर्डातील गणपती मंदिर, बाबूपेठमधील महादेव मंदिर, समाधी वॉर्डातील राम मंदिर, वैरागड येथील गोरजाईचे मंदिर, घुटकाळा तलाव, माकर्डेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार आदी बांधकामे करून आपले नाव चंद्रपूरच्या इतिहासात अजरामर केले. 

राणी हिराईच्या काळात महाकाली यात्रा

राणीनेच चैत्र महिन्यात पौर्णिमेस महाकालीची यात्रा सुरू केली. ती आजपण सुरू आहे. बीरशहाच्या मृत्यूनंतर राणी हिराईने चंदनखेडा येथील दीर अर्थात बिरशहाचा चुलत भाऊ गोंविदशहा यांच्या तीन वर्षांच्या मुलास दत्तक घेतले. मुलाचे नाव रामशहा असे ठेवले. दिवाण बापूजी वैद्य यांच्या मदतीने तिने कारभार बघितला. 1704 ते 1719 पर्यंत म्हणजे रामशहा सज्ञान होईपर्यंत राज्यकारभार चालविला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Queen's monument built in Chandrapur in love with the king