बापरे! गोंदिया जिल्ह्यात सापडला बनावट दारूचा कारखाना, पोलिसांनी केला साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : जप्त केलेल्या साहित्यांसह उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचारी.
गोंदिया : जप्त केलेल्या साहित्यांसह उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचारी.

गोंदिया : शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने पैकनटोली येथील बनावट दारू कारखान्यावर छापा टाकला. यात १२ लाख ५४ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (ता. २१) उशिरा करण्यात आली.

श्‍याम ऊर्फ पीटी रमेश चाचेरे (वय ३४, रा. वाजपेयी चौक, गोंदिया) याच्या मालकीच्या गोदामात हा दारूसाठा सापडला.

पैकनटोली येथे अवैधरीत्या बनावट दारू तयार करण्याचा कारखाना असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे व पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेवरून गुन्हे प्रगटीकरण शाखेने पैकनटोली येथे श्‍याम चाचेरे याच्या मालकीच्या घर व गोदामात छापा टाकला.

यावेळी गोदामात ४४ सीलबंद बॉक्‍स गोवा विस्की बनावट दारू आढळली. या दारूची किंमत २ लाख २१ हजार ७६० रुपये इतकी आहे. पथकाने ही दारू जप्त केली.

शिवाय एमएच २८-ए. बी. ०७७० क्रमांकाचे चारचाकी मालवाहू वाहन, बनावट दारू तयार करण्याकरिता वापरण्यात येणारे आणि रासायनिक द्रव्याने भरलेले प्लॅस्टिक कॅन, प्रत्येक कॅनमध्ये २० लिटर रासायनिक द्रव्य अशा एकूण ७०० लिटर द्रव्याच्या ३५ कॅन, रासायनिक द्रव्य वापरलेल्या ४७ रिकाम्या प्लॅस्टिक कॅन, ७५ प्लॅस्टिक पिशवीत असलेल्या ३०० रिकाम्या काचेच्या बॉटल्स, दारू साठविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या ३५० रिकाम्या प्लॅस्टिक बॉटल्स, दारू बॉटल सील करण्याकरिता वापरण्यात येणारे ४ हजार ५०० झाकन, ७ हजार ९८० स्टीकर, एक दुचाकी, ड्रम, खर्डा, मोबाईल हॅण्डसेट असा एकूण १२ लाख ५४ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्‍व पानसरे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहरचे ठाणेदार बबन आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, पोलिस उपनिरीक्षक काशीद, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, पोलिस नायक जागेश्‍वर उईके, ओमेश्‍वर मेश्राम, सुबोध बिसेन, महेश मेहर, तुलसीदास लुटे, योगेश बिसेन, पोलिस शिपाई छगन विठ्ठले, विनोद शहारे, रॉबिन्सन साठे, नीतेश गवई यांनी केली.

तीन जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी श्‍याम ऊर्फ पीटी रमेश चाचेरे (वय ३४, रा. वाजपेयी चौक, गोंदिया), प्रसन्ना ऊर्फ टन्टू संजय कोथुलकर (वय २४, रा. श्रीनगर, मालवीय वॉर्ड, गोंदिया) तसेच महेंद्रसिंग ऊर्फ मोनू उपेंद्रसिंग ठाकूर (वय २९, रा. श्रीनगर, वाजपेयी, चौक, गोंदिया) यांच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com