esakal | सावकारांच्या घरांवर धाडसत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

raidss.jpg

अवैध सावकारी तक्रारीचे अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे तीन पथके गठीत करुन १८ व १९ जानेवारी रोजी अकोला शहरात दोन सावकारांच्या घराची व कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. या धाड सत्रात लाखोची रोकड व दस्तऐवज हस्तगत करण्यात आले.

सावकारांच्या घरांवर धाडसत्र 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अवैध सावकारी तक्रारीचे अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे तीन पथके गठीत करुन 18 व 19 जानेवारी रोजी शहरात दोन सावकारांच्या घराची व कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. या धाड सत्रात लाखोची रोकड व दस्तऐवज हस्तगत करण्यात आले असून, मिळालेल्या वस्तूंची आणि संबंधितांच्या व्यवहाराची तपासणी गठीत पथकांद्वारे सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी सागितले.

अवैध सावकारी संबंधाने तक्रार प्राप्त झाल्याने राजस्थान भवन, जुना कॉटन मार्केट, अकोला येथील संतोष शंकरलाल राठी यांच्या कार्यालयाची व राजराजेश्वर हाउसिंग सोसायटी, मराठा नगर अकोला येथील त्यांच्याच घराची आणि रामनगर, अकोला येथील राजेश घनश्यामदास राठी यांच्या घराची व कार्यालयाची महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये झडती घेण्यात आली. त्यासाठी 18 जानेवारी रोजी जिल्हा परिषद अकोला यांचेकडून पंच घेण्यात आले व पोलिस विभागाकडून बंदोबस्त मागविण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

तीन पथकांनी केली कारवाई
अकोला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक एस.डब्ल्यू. खाडे, अकोट तालुक्याचे सहाय्यक निबंधक एम.एस. गवई आणि बार्शीटाकळी तालुक्याचे सहाय्यक निबंधक एस.पी. पोहरे यांना तीन वेगवेगळ्या पथकांचे प्रमुख नियुक्त करुन, शहरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी 18 व 19 जानेवारी रोजी छापे टाकून झाडाझडती घेण्यात आली.

लाखोची रोख आणि दस्तऐवज हस्तगत
या कार्यवाही दरम्यान संतोषकुमार शंकरलाल राठी यांचेकडून 24 लाख 94 हजार 697 रुपये रोख, चिठ्या, 89 धनादेश व काही खरेदीखत हस्तगत करण्यात आले. राजेश घनश्यामदास राठी यांचेकडून 8 लाख 34 हजार 505 रुपये रोख, अंदाजीत खरेदीखत, 341 धानदेश, चिट्ट्या, संगणक आढळून आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली.

तपास सुरू
याबाबत शहानिशा करुन प्राप्त दस्तऐवज या संबंधाने संबंधीतास म्हणणे मांडण्याची संधी देवून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 17 व कलम 18 मधील तरतुदीन्वये कार्यवाही करण्यात येईल. सदरहू कार्यवाही नियुक्त पथकामार्फत पंचासमक्ष करण्यात आली आहे. याबाबत सद्यस्थितीत पडताळणी सुरू असून, कामकाम पूर्ण झाल्यानंतर व पथक प्रमुखांकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयास अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ.प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला