ऐन मुहूर्तावरच पावसाचे फटाके

ऐन मुहूर्तावरच पावसाचे फटाके

नागपूर : नागपूरकर रविवारी लक्ष्मीपूजनाच्या तयारीत असताना अचानक विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन मुहूर्तावर बरसलेल्या धो-धो पावसामुळे फटाक्‍यांच्या आतषबाजीला काही काळ "ब्रेक' लागला. हवेतील बाष्प व नागरिकांनी ग्रीन फटाक्‍यांना अधिकाधिक पसंती दिल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रदूषणही कमी झाल्याचे दिसून आले. 
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तीन-चार दिवसांपासून विदर्भात पावसाळी वातावरण आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारी व रविवारी विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिलेला होता. तो इशारा तंतोतंत खरा ठरला. दोन्ही दिवस नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनोत्तर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शनिवारी दुपारी वादळी पावसाने झोडपून काढल्यानंतर नागपूरकरांना लक्ष्मीपूजनही पावसातच "सेलिब्रेट' करावे लागले. सायंकाळी सहानंतर घराघरांमध्ये दिवाळीची तयारी सुरू असताना अचानक ढग दाटून आले. पाहतापाहता शहरात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सातच्या सुमारास जवळपास तासभर दणादण पाऊस बरसला. आठनंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर फटाक्‍यांची आतषबाजी पुन्हा सुरू झाली. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाके कमीच फुटले. यासाठी पावसामुळे हवेत निर्माण झालेले बाष्प मुख्यत्वे कारणीभूत ठरले. शिवाय कमी आवाजांच्या फॅन्सी व ग्रीन फटाक्‍यांमुळेही यावेळी प्रदूषण कमी झाले. उल्लेखनीय म्हणजे, नागपूरकरही फटाक्‍यांच्या बाबतीत आता अधिक जागरूक झाले आहेत. 
शहरात दोन दिवसांत तब्बल 50 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. यात शनिवारच्या 35 मिलिमीटरचा समावेश आहे. ऑक्‍टोबर महिन्यात 48 तासांमध्ये एवढा पाऊस पडण्याची अलीकडच्या काळातील बहुधा ही पहिलीच वेळ असावी. शिवाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही जोरदार पाऊस प्रथमच पाहायला मिळाल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर कुठे गुडघाभर तर कुठे मांडीभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच त्रेधा उडाली. विदर्भातील वर्धा (31 मिलिमीटर), अकोला (24.2 मिलिमीटर), वाशीम (20 मिलिमीटर), यवतमाळ (19.2 मिलिमीटर) आणि अमरावती (11.6 मिलिमीटर) या जिल्ह्यांमध्येही दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. 
"क्‍यार'चा धोका टळला 
अरबी समुद्रात निर्माण झालेले "क्‍यार' नावाचे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकल्याने महाराष्ट्रावरील संभाव्य धोका टळला आहे. तथापि, कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे आणखी एक-दोन दिवस विदर्भात पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर हळूहळू थंडी पडायला सुरुवात होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com