अवकाळी व गारपिटीमुळे होळी होणार थंडी...हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

सडक अर्जुनीत गारपीट आणि सालेकसा, गोंदिया, आमगाव व गोरेगाव तालुक्‍यात शुक्रवारी (ता. 6) पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पुन्हा हवामान खात्याने 9 व 10 मार्च रोजी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस पडेल, असे संकेत दिले आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशाराही दिला आहे.

गोंदिया : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सुरुवातीच्या दिवसांत पारा वर चढत असताना आता अवकाळी पाऊस माघारी फिरेल, असे जिल्हावासींना वाटत होते. परंतु, हा अंदाज खोटा ठरला आहे.

दररोज सकाळी ऊन तापत असते. सायंकाळी ढगाळ वातावरणनिर्मिती होऊन कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याने 5 व 6 मार्च रोजी जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगटासह पाऊस पडेल, असे संकेत दिले होते. त्यानुसार, 6 मार्च रोजी सकाळपासून दुपारी तीननंतर वातावरणात अचानक बदल घडून आला.

ढगांचा गडगटाट, वादळीवारा सुटला. सालेकसा, गोंदिया, आमगाव व गोरेगाव तालुक्‍यात पावसाने तुरळक हजेरी लावली. सडक अर्जुनी तालुक्‍यात मात्र गारपिटीसह दमदार पाऊस झाला. या तालुक्‍यातील डव्वा परिसराला पावसाने अक्षरशः घेरले होते.

गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल

दरम्यान, आज, शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण असताना रात्री उशिरार्यंत जिल्ह्याच्या बहुतांश भागांत गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. शिवाय 9 व 10 मार्चलाही गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे होळी आणि धुलीवंदनाच्या सणावर पावसाचे सावट कायम आहे.

हेही वाचा : अपघातग्रस्त बसला वाट मोकळी करून देण्यासाठी त्याने घेतला हा निर्णय...

भाजीपाला, कडधान्ययुक्त पिकांना फटका

अवकाळी पावसामुळे भाजीपाला व कडधान्ययुक्त पिकाला जबरदस्त फटका बसला आहे. या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून, उत्पादन अर्ध्यावर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पिकांचे सर्वेक्षण करावे व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आरोग्यावरही होणार परिणाम

वातावरणातील बदलाचा लहान मुले व वृद्धांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, शासकीय रुग्णालयाचा बाह्य विभाग रुग्णांच्या गर्दीने दररोज भरलेला दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain, hailstorm and during the Holi festival