'समृद्धी' महामार्गामुळे शेतीच्या समृद्धीवर गदा! शेतांमध्ये साचले पाणीचपाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

मंगळवारी रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि समृद्धी महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे गुमगाव शिवारातील गुमगाव-सालईदाभा रस्त्यालगत असलेल्या कित्येक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

गुमगाव(जि. नागपूर) : रस्ते, महामार्ग हे राष्ट्राच्या समृद्धीचे मार्ग आहेत. त्यामुळे देशभर महामार्गाचे जाळे विणण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्गही याच प्रयत्नाचा एक भाग. मात्र या महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे या महामार्गालगतची शेते वाहून जाण्याची वेळ आली आहे. इतर प्रगती महत्त्वाची असली तरी अन्नधान्य ही प्राथमिक गरज आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांची प्रगती महत्त्वाची आहे, मात्र व्यावसायिक प्रगतीच्या मागे लागलेल्यांचा शेतकरी हिताकडे कानाडोळा होतो आहे काय? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

हिंगणा तालुक्‍यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या निर्मितीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. मंगळवारी रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि समृद्धी महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे गुमगाव शिवारातील गुमगाव-सालईदाभा रस्त्यालगत असलेल्या कित्येक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शेतात पाणीच पाणी दिसत असल्याने शेतांना सध्या तलावाचे स्वरूप आले आहे. एकीकडे शेतकरी बाजारपेठेतून महागडी बी-बियाणे,खते आणून पेरणी करीत असतांना शेतातील पिके महामार्गाच्या नियोजनशून्य धोरणामुळे ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

यंदा मान्सून वेळेत आला आणि शेतकरी आनंदला. नांगरून-वखरून तयार असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणून पेरणी केली. निंदण आणि खते देऊन तयार पिके पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अक्षरशः पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ठेकेदाराने पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने शेतीतील पिके पाण्याखाली जाऊन शेतीला सध्या तलावाचे स्वरूप येत आहे. बांधकाम विभागाने आधी आमच्या शेतातून पावसाचे पाणी बाहेर निघण्याची व्यवस्था करून द्यावी आणि शेतातील पिकांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सुभाष आष्टनकर, सुरेंद्र मुते, सुनिल आष्टनकर, मनोहर मुते या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केलेली आहे.

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढे यांनी या वादाविषयी केला मोठा खुलासा...

शेतकरी हवालदिल
पावसाची दीर्घकाळ दडी, प्रतिकूल वातावरण आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी गेल्या काही वर्षांपासून त्रस्त आहेत. शेतकऱ्यांनी या दशकात एकही वर्ष सुखाचे,समाधानाचे आणि समृद्धीचे पाहिले नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतातील पिके पाण्याखाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पिकांचा उत्पादनखर्च भरून निघण्याची शक्‍यता मावळल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain water in farm due to wrong planning of Samrudhhi Mahamarg