गोंदिया जिल्ह्यात पुन्हा बरसला...वादळ, गारपिटीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

गोंदिया जिल्ह्याला वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे धान, भाजीपाला पिकासह केळी बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. सडक अर्जुनी तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला. जिल्ह्यात सहा जूनपर्यंत आणखी पाऊस बरसण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पाऊस काही जिल्ह्याचा पिच्छा सोडेना, अशी भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

गोंदिया : रविवारी (ता. 31) सायंकाळी दमदार एन्ट्री केलेल्या पावसाने पुन्हा सोमवारी (ता. 1) पहाटे आणि मंगळवारी (ता. 2) सकाळपासून दुपारपर्यंत जिल्ह्याच्या बहुतांश भागांत जोरदार हजेरी लावली. वादळ आणि गारपिटीमुळे सडक अर्जुनी तालुक्‍यात केळीच्या बागेसह भाजीपाला पिके आणि कौलारू घरांचे मोठे नुकसान झाले. विद्युत तारा तुटल्याने अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

 

यंदा जून महिन्याची सुरुवात पावसानेच झाली. मंगळवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत गोंदिया शहर व तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. शहरातील रस्ते ओलेचिंब झाले. खड्ड्यांत पाणी साचून होते. यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.

 

सडक अर्जुनी तालुक्‍याला सर्वाधिक फटका

सडक अर्जुनी तालुक्‍याला मात्र या पावसाचा फटका बसला. दोन दिवसांत आलेल्या पावसाने आणि गारपिटीने दल्ली, जिराटोला, बाह्मणी व खडकी आदी गावांतील 10 ते 12 शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची बाग व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. दल्ली येथील 200 च्या वर घरांवरील कवेलू फुटली आहेत. एका घरावर झाड पडले असून, नुकसान झाले आहे. विद्युत तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. गोदामाबाहेर ठेवलेल्या धानावरील ताडपत्र्या उडाल्याने धानही भिजले. दरम्यान, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापगते, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, तहसीलदार उषा चौधरी, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रिकर, कृषी सहायक सुशील वाघाये आदींनी भेट देऊन पाहणी केली.

जाणून घ्या : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्भवती मातांसाठी असावी ही सुविधा...

वातावरणात गारवा

गोरेगाव तालुक्‍यात सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रब्बी हंगामातील धान पिकाची मळणी थांबली. फारसे नुकसान मात्र झाले नसल्याची माहिती आहे. अर्जुनी मोरगाव, तिरोडा, आमगाव, देवरी, सालेकसा या तालुक्‍यांतदेखील पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह बरसलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

हेही वाचा : गोंदिया जिल्ह्यात काय आहेत लॉकडाउनचे नवीन नियम? घ्या जाणून

6 जूनपर्यंत मध्यम पाऊस

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 2 ते 6 जूनपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह हलका, मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rains in Gondia district again caused damage