सरकार नागपुरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नागपूर - पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून प्रारंभ होत असून उद्या मुख्यमंत्र्यांसह  संपूर्ण सरकार आणि विरोधक सुमारे तीन आठवड्यांसाठी नागपुरात येत आहेत. कर्जमाफीतील घोळ आणि गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्यांमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून यंदाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर - पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून प्रारंभ होत असून उद्या मुख्यमंत्र्यांसह  संपूर्ण सरकार आणि विरोधक सुमारे तीन आठवड्यांसाठी नागपुरात येत आहेत. कर्जमाफीतील घोळ आणि गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्यांमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून यंदाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्‍यता आहे. 

विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला बैठक बोलावली असून त्यात रणनीती ठरविण्यात येणार आहे. विरोधकांचा मूड लक्षात घेता ते आक्रमक भूमिका घेतील अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. नागपुरात गेल्या १०० दिवसांत ६३ खून झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा या अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे.

विरोधी  पक्षांतील बहुतेक नेते मंगळवारी नागपुरात पोहोचणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, एमआयएम व काही अपक्ष आमदारही सत्ताधारी पक्षातील नेत्यांना घाम फोडण्यासाठी तयार आहेत.

विरोधकांची बैठक मंगळवारला सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील रविवारी नागपुरात येऊन गेले. त्यांनी कोणत्या मुद्यांवर सरकारला घेरायचे व कोणते मुद्दे लावून धरायचे, यावर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. विधान परिषदेच्या उमेदवार निवडीबद्दल महत्त्वपूर्ण बैठक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलावल्यामुळे ते आज दिल्लीला गेले.

मंगळवारला सकाळी ते परत नागपुरात येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत पावसाळी अधिवेशनात आक्रमकपणे किल्ला लढविण्याचे ठरविले आहे. विरोधकांचा मूड लक्षात घेता उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर ते बहिष्कार टाकतील असे दिसून येते.

सत्ताधाऱ्यांना धरणार धारेवर 
शेतकऱ्यांसाठी फसलेली कर्जमाफी योजना, शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने असलेला असंतोष, पिकांना मिळत नसलेला भाव, औरंगाबादमध्ये झालेली दंगल, धुळ्यात पाच जणांची जमावाने केलेली हत्या हे मुद्दे विरोधकांकडे आहेत. या मुद्यांवरून सत्ताधारी पक्षाला विरोधक धारेवर धरण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainy Session Goverement