esakal | विजयाच्या पुनरावृत्तीचे भाजपसमोर आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

कॉंग्रेस आणि शेतकरी संघटनेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या राजुरा विधानसभा मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच भाजपचा उमेदवार विजयी झाला. यावेळी भाजपसमोर तीन माजी आमदारांचे आव्हान राहणार आहे. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करणे भाजपला कठीण होऊ शकते, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये आहे.

विजयाच्या पुनरावृत्तीचे भाजपसमोर आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघ हा तेलंगणा राज्याच्या सीमेलगत आहे. कुणबी, आदिवासी, तेलुगू आणि मुस्लिम मतदारांची संख्या येथे निर्णायक आहे. त्यामुळे बहुतेक राजकीय पक्ष या मतदारसंघात कुणबी उमदेवारांना प्राधान्य देतात. आजवरचा तसा इतिहासही आहे. याही वेळेला तेच होण्याची शक्‍यता आहे. गोंडपिपरी, कोरपना, जिवती आणि राजुरा असे चार तालुके मिळून हा मतदारसंघ झाला आहे. प्रत्येक तालुक्‍याची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. त्यांचे प्रश्‍न वेगळे आहे.
शेतकरी संघटना आणि कॉंग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात 2014 मध्ये भाजपचे ऍड. संजय धोटे यांनी विजय मिळविला व कॉंग्रेसचे उमदेवार माजी आमदार सुभाष धोटे यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला. शेतकरी संघटनेचे माजी आमदार ऍड. वामनराव चटप रिंगणात नव्हते. मात्र, यावेळी धोटे आणि चटप दोघेही रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत अपेक्षित आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला या मतदारसंघातून 33 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत भाजप वगळता इतर सर्व एकत्र आले होते. विधानसभा निवडणुकीत ही परिस्थिती राहणार नाही. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. विद्यमान आमदार संजय धोटे यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे या मतदारसंघातून भाजपकडून उमदेवारीसाठी प्रयत्नशील आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
या निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांना 25 हजार मते मिळाली. कॉंग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनाच उमेदवारी मिळेल, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध आहे. कॉंग्रेसच्या एक गटाचा त्यांना विरोध आहे. दोनदा आमदार राहिलेले शेतकरी संघटनेचे ऍड. वामनराव चटप तब्बल दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या उमेदवारीने येथील राजकीय समीकरण बदलणार आहे.

loading image
go to top