सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची भाऊगर्दी

राजेश काळे
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

राळेगाव-बाभूळगाव विधानसभा मतदारसंघात राळेगाव, कळंब व बाभूळगाव या तीन तालुक्‍यांचा समावेश होतो. ही तिन्ही तालुके आदिवासीबहुल आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघाच्या आमदारांना शक्‍यतोवर कॅबिनेट मंत्रिमंडळात संधी मिळते असा अनुभव आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास अनेक जण उत्सुक आहेत. त्यामुळेच की काय सर्वच पक्षांकडे उमेदवारांचा रांग लागली आहे. आणि भाजप व कॉंग्रेसमध्ये तर स्पर्धा दिसून येत आहे.

यवतमाळ : राळेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेनेसह वंचित बहुजन विकास आघाडीकडेही उमेदवारीसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. काही झाले तरी उमेदवारी मिळवायची त्यांची तयारी आहे. विद्यमान आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके हे गेल्या वेळेस भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. सध्या ते कॅबिनेट मंत्री आहेत. आदिवासीमंत्री म्हणून काम करीत असताना डॉ. उईके राज्यभर दौरे करीत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज भाजपच्या पाठीमागे उभे राहील, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी असलेले निकटचे संबंध, शिवाय कॅबिनेट मंत्री असल्याने तिकीटचा प्रश्‍नच नाही असे डॉ. उईकेंच्या कार्यकर्त्यांना वाटते आहेत. तर, तेसुद्धा मंत्री असताना मतदारसंघात वारंवार भेटी देत आहेत. मतदारसंघाशी त्यांची असलेली गाठ ते आणखी मजबूत करीत आहे.
नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मतदारसंघात येऊन गेली. यात्रेला मिळालेला प्रतिसाद यामुळे उईके यांचे बरेच रिलॅक्‍स झाले आहेत. दुसरीकडे वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी हेसुद्धा भाजपच्या उमेदवारीसाठी कंबर कसून आहेत. ते असंतुष्टांना घेऊन कायम मतदारसंघात फिरत आहेत. उमेदवारीचा आपल्याला शब्द मिळाल्याचा दावा ते करीत आहेत. डॉ. उईके मंत्री झाल्यावर त्यांची मोहीम थांबेल असे वाटत होते. पण, त्यांनी आणखी मोहिमेला गती दिली आहे. पक्षातील काही नेते व कार्यकर्ते त्यांना सहकार्य करीत आहेत. नुकतेच महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगाव येथे आले असता नितीन मडावी यांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्‍स लावले होते.
भाजपप्रमाणेच कॉंग्रेसमध्येही उमेदवारीसाठी स्पर्धा दिसून येत आहे. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके हे पुन्हा एकदा निवडणुकीसाठी तयार आहेत. ते सहाव्यांदा निवडणूक लढवतील. गेल्या पाच वेळेस ते लढले असून चारवेळा विजयी झाले तर एकवेळा त्यांच्या वाट्याला पराभव आला आहे. प्रा. पुरके यांनाच कॉंग्रेसची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. त्यांचे वरिष्ठ पातळीवर असलेले संबंध, शिवाय नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचेशी त्यांचे घनिष्ठ संबंध त्यांच्या मदतीला आहे.
किरण कुमरे हेसुद्धा कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत. काही कॉंग्रेसचे नेते त्यांच्यासोबत आहेत. तसेच वरिष्ठ नेते नाना पटोले आदींशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. नुकतेच ते काही नेत्यांना घेऊन तिकिटासाठी दिल्लीवारी करून आले आहेत. याशिवाय कॉंग्रेसच्या तिकिटासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यात 11 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीत युती झाल्यास राळेगाव विधानसभा मतदारसंघ युतीत भाजपकडे व आघाडीत कॉंग्रेसकडे राहील असे वाटते. याशिवाय प्रहारकडून गुलाबराव पंधरे हेसुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तसेच मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने प्रत्येक निवडणुकीआधी मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सक्षम आदिवासी नेत्यांना उमेदवारीचे भरते येते. ते याही वेळेस आले आहे. फ्लेक्‍सच्या माध्यमातून मतदारसंघात ते शक्तिप्रदर्शन करीत आहे.

प्रहार जनशक्ती देणार उमेदवार
वंचित बहुजन विकास आघाडी, प्रहार जनशक्ती पक्षाकडेही अनेकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. या मतदारसंघात आदिवासी एवढीच दलित, मुस्लिम व बहुजनातील इतर समाजबांधवांची संख्या असल्याने या पक्षांना महत्त्व आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ralegaon vidhansabha constituency