भरधाव दुचाकी धडकली अन्‌ झाले अघटित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

दोन युवक दुचाकीने जात होते. भरधाव वाहनावरून चालकाने नियंत्रण सुटले आणि नाल्याच्या सुरक्षा भिंतीला जाऊन धडकले. या अपघातात भिंत तुटून वाहन नाल्यात पडले. यात दोन्ही तरुण फेकले गेल्याने एक नाल्यातील झाडात तर दुसरा शेजारी पडला. 

नागपूर : 2019 हे वर्ष अपघात, बलात्कार, खून आदींनीच गाजले. सतत होणाऱ्या खुनांमुळे शहराची प्रतीमा मलीन झाली आहे. वर्ष संपायला दोन दिवस शिल्लक असताना आणखी एका अपघातात दोन तरुणांचा जीव गेला. त्यामुळे अपघातांच्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येन दोन जणांची भर पडली आहे. 

भिवसनखोरी रोडवरील नाल्याच्या सुरक्षा भिंतीला भरधाव दुचाकीची जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. रजत पुरुषोत्तम मोहरकर (25) आणि अक्षय गोपाल डुकरे (23) दोघेही रा. अमर आशा सोसायटी, नागपूर असे दोन्ही मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि रजत हे दोघेही शिक्षण घेत असून, शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास दुचाकीेने भिवसनखोरी परिसरात आले होते. येथे जेवणासह इतर काम झाल्यावर ते घराकडे जाण्यासाठी निघाले. भरधाव दुचाकी चालवत असताना भिवसनखोरी ते वायुसेना गेटच्या मधातील नाल्याजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. वाहन नाल्याच्या सुरक्षा भिंतीवर जोरात आदळल्यावर भिंत तोडून गाडी थेट नाल्याच्या पडली. 

जाणून घ्या - ओल्या पार्ट्या अन्‌ रात्र...

यात दोन्ही तरुण फेकले गेल्याने एक नाल्यातील झाडात तर दुसरा शेजारी पडला. जोराचा आवाज झाल्यावर परिसरातील नागरिकांनी येथे शोधाशोध सुरू केली. दरम्यान दुचाकीचा लाईट नाल्याच्या गाळात सुरू असल्याचे काहींच्या निदर्शनात आले. त्यांनी पोलिस कंट्रोल रूमला सूचना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघत तातडीने येथे पोहोचून इतर यंत्रणेला कळवत नाल्यातील वेगवेगळ्या भागात शोधाशोध सुरू केली. 

एक तरुण नाल्यातील झाडात पडलेला तर दुसरा शेजारी पडलेला असल्याचे दिसले. दोघांना बाहेर काढत तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केल्यावर तसेच शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन केले. त्यात एकाच्या टोक्‍याला तर दुसऱ्याच्या छातीला मार असल्याचे प्राथमिक अहवालात पुढे आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

सविस्तर वाचा - घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् कोसळले दुःखाचे डोंगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur : Two killed in accident