गोंदियात आता रॅपिड अँटीजन तपासणी...कोरोनाचे होणार निदान...अंमलबजावणी सुरू

file photo
file photo

गोंदिया : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांसह आरोग्य प्रशासनही चिंतेत सापडले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा, याकरिता तातडीने रॅपिड अँटीजन तपासणीच्या माध्यमातून आता कोरोना संशयितांचे त्वरित निदान होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात या अनुषंगाने नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. नितीन कापसे, डॉ. प्रशांत तुरकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरात पथदर्शी प्रकल्प

डॉ. बलकवडे म्हणाल्या की, कोरोना संशयितांचे त्वरित निदान करण्यासाठी जिल्ह्यात रॅपिड तपासणी प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून गोंदिया शहरातील कुंभारेनगर येथे ही तपासणी सुरू करण्यात आली. कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या प्राथमिक तपासणीकरिता टेस्ट किट अत्यंत उपयोगी आहे.

तीस मिनिटांत मिळतो अहवाल

या चाचणीचा अहवाल केवळ तीस मिनिटांत उपलब्ध होतो. त्यामुळे प्रशासनाला जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी तातडीने आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.
रॅपिड अँटीजन तपासणीकरिता सारी, आयएलआय, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार त्याचप्रमाणे कायमस्वरूपी असणारे आजार, गरोदर महिला, 60 वर्षांवरील व्यक्ती तसेच कोरोना संशयितांची तपासणी रॅपिड अँटीजन किटच्या माध्यमातून करता येणार आहे.

नागरिकांनी कोरोना अँटीजन चाचणी करावी

रॅपिड अँटीजन टेस्टमधून संशयित व्यक्ती हा कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्यास त्याच व्यक्तीला कोविड केअर सेंटर अथवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार करण्यात येईल. जर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्या व्यक्तीला घरी पाठविता येईल. तरी कॅटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी न घाबरता आपली कोरोना रॅपिड अँटीजन चाचणी करण्यास पुढे यावे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com