सतत भिरभिरणारा दुर्मिळ कॉमन बॅंडेड पिकॉक फुलपाखरूची वर्धेत नोंद

रूपेश खैरी
Saturday, 26 December 2020

कॉमन बॅंडेड पिकॉक फुलपाखराच्या जातीचे वैज्ञानिक नाव पेपिलियो क्रिनो असे असून मराठीत त्याला पट्टमयूर असे संबोधले जाते. या काळ्या रंगाच्या फुलपाखराच्या पंखांच्या वरच्या बाजूने निळसर हिरव्या रंगांचे बॅंड असतात. हे आकाराने मोठे असलेले व वेगवान उड्डाण करणारे फुलपाखरे असून पंखांचा फैलाव ८०-१०० मिमी एवढा असतो.

वर्धा : विदर्भातील दुर्मिळ कॉमन बॅंडेड पिकॉक म्हणजेच मराठीत पट्टमयूर या नावाचे ओळखला जाणाऱ्या फुलपाखराची नोंदी वर्ध्यात झाली आहे. ही नोंद आजपर्यंतच्या इतिहासातील पहिलीच आहे. ही नोंद वन्यजीव छायाचित्रकार व हौशी फुलपाखरू निरीक्षक राहुल वकारे यांनी ९ नोव्हेंबर २०२० रोजी रिधोरा भागात केली.

वर्धेतील ही पहिलीच नोंद असल्याची माहिती किटकतज्ञ डॉ. आशीष टिपले यांनी दिली. सेलू येथील विद्याभारती कॉलेजमधील पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. आशीष टिपले यांनी विदर्भात नागपूर, अमरावती, बोर व्याघ्र प्रकल्प तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात फुलपाखरांवर शास्त्रीय अभ्यास केला आहे. वन्यजीव छायाचित्रकार राहुल वकारे हे गत हा वर्षांपासून पक्षी, वन्यजीव, फुलपाखरू, किटक अशा अनेक प्रकारच्या सजीवांचे चित्रण करीत आहे.

जाणून घ्या - नागपुरात प्रशासनाचे धाबे दणाणले: इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या युवकामुळे तब्बल १० जण पॉझिटिव्ह; नमूने पुण्याच्या एनआयव्हीकडे

यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील बिग बटरफ्लाय मंथमुळे पक्षी अभ्यासासोबत फुलपाखरांचे निरीक्षण व छायाचित्रणासोबत प्रामुख्याने जोडले गेले. मालेगाव ठेका, आमगाव जंगली भागात जंगल भ्रमंतीत रिधोरा भागात मोठ्या आकाराचे फुलपाखरू त्यांना दिसले. पण सतत भिरभिरत असल्याने छायाचित्र घेणे अत्यंत बिकट होते. काही मिनिटांनंतर त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे उडतानाच छायाचित्र घेतले गेले.

कॉमन बॅंडेड पिकॉक फुलपाखराच्या जातीचे वैज्ञानिक नाव पेपिलियो क्रिनो असे असून मराठीत त्याला पट्टमयूर असे संबोधले जाते. या काळ्या रंगाच्या फुलपाखराच्या पंखांच्या वरच्या बाजूने निळसर हिरव्या रंगांचे बॅंड असतात. हे आकाराने मोठे असलेले व वेगवान उड्डाण करणारे फुलपाखरे असून पंखांचा फैलाव ८०-१०० मिमी एवढा असतो.

क्लिक करा - पोलिसांना झाले काय? वाहतूक पोलिस शाखेत एटीपीच्या नावाखाली वसुलीबाज युवक

यापूर्वी विदर्भात चार जिल्ह्यांत झाली नोंद

पट्टमयूरचे प्राधान्य क्रमाने असलेले तसेच सूरवंटीचे खाद्य वनस्पती म्हणजे भेरा. परंतु, नवीन अभ्यासानुसार भेऱ्याचे प्रमाण ज्या भागात कमी आहे तिथे लिंबू वर्गीय झाडं वाढल्याचे निर्देशनात आले आहे. पट्टमयूर ही एक स्थलांतरित प्रजाती आहे. हे फुलपाखरू भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळते. यापूर्वी पट्ट मयूर या फुलपाखराची नोंद विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर येथे झाली आहे. तसेच यावर्षी डिसेंबर महिन्यात भंडाऱ्यातही नोंद झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rare common banded peacock butterfly found in Wardha