इथे दहन नाही, पूजा होते रावणाची; मूर्तीसमोर होतात सारेच नतमस्तक

मिलिंद उमरे  
Tuesday, 27 October 2020

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्‍याकडे जाताना दुधमाळा हे गाव आहे. या गावाच्या मागेच परसवाडी नावाचे चिमुकले आदिवासी गाव आहे. हे गाव रावणपूजेसाठी सर्वत्र विख्यात आहे.

गडचिरोली  : रामायणात रावणाला दहा तोंडाचा खलनायक म्हणून रंगविण्यात आले असले, तरी भारतात काही अशी मोजकी ठिकाणे आहेत जिथे रावणाला आपला पूर्वज मानून देवासारखी त्याची पूजा करण्यात येते. असेच एक ठिकाणी आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात असून हे गाव परसवाडी या नावाने ओळखले जाते. येथे रावणाचे मंदिर बांधण्यात आले असून मागील अनेक वर्षांपासून येथे रावणाच्या आराधनेची परंपरा अव्याहत सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्‍याकडे जाताना दुधमाळा हे गाव आहे. या गावाच्या मागेच परसवाडी नावाचे चिमुकले आदिवासी गाव आहे. हे गाव रावणपूजेसाठी सर्वत्र विख्यात आहे. विजयादशमीच्या दिवशी इतरत्र रावणाला दुष्ट प्रवृत्तीचा मानून त्याचा व त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि पुत्र मेघनाद/इंद्रजित यांचे पुतळे जाळले जात असताना या गावात आदिवासी बांधव रावणाला आपला महान पूर्वज मानून त्याची मनोभावे पूजा करतात. 

आदिवासींच्या म्हणण्यानुसार राजा रावण हा कोयावंशीय आदिवासी राजा होता. तो मडावी गोत्राचा होता, असेही काही अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे दरवर्षी येथे रावणपूजनाचा उत्सव उत्साहात साजरा होतो. यंदाही रविवारी (ता. २५) धानोरा तालुक्‍यातील परसवाडी येथील रावण मंदिरात मुळनिवासी कोयावंशीय आदिवासी राजा रावण यांचे पूजन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस रामदास जराते यांच्या हस्ते अत्यंत साधेपणाने आणि शारीरिक अंतर ठेवून पूजा करण्यात आली. 

अधिक वाचा - एकनाथरावांना सासुरवाडीतून कोण साथ देणार?
 

यावेळी पुरोगामी युवक संघटना जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर, धानोरा तालुका चिटणीस हिरामण तुलावी, पोलिस पाटील श्‍यामराव पोरेट्टी, गाव पुजारी मोतीराम हलामी, वसंत हलामी, विनायक तुलावी, देवराव आतला, हरिश्‍चंद्र शेडमाके, आशिष प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना रामदास जराते म्हणाले की, राजा रावण हे संपूर्ण आदिवासी समाजाचे दैवत आणि आदर्श आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करून आदिवासी समाजाच्या भावना दुखावण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी यापुढे करू नये. जे लोक रावण दहन करतात त्यांनी आपले कर्तृत्व तपासले पाहिजे. 

केवळ मनुवादाने प्रेरित पोथीनिष्ठ कथांच्या आधारावर मूळनिवासी पराक्रमी राजाला वाईट ठरवून त्याचे दहन करून मुळनिवासींना हिणवण्याचा प्रकार यापुढे गैर आदिवासींनी बंद करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी तानाबाई हलामी, जानीबाई टेकाम, पार्वता कडयामी, वच्छला जाळे, जैवंता पदा, विमल पोरेट्टी, कांता पोरेट्टी, वनिता तुलावी, रावण दलाचे कार्यकर्ते पुनेश्‍वर उसेंडी, कैलास दुग्गा, आशीष पोरेट्टी, विजय जाळे, अमीत पोरेट्टी, महेंद्र सलामी, प्रल्हाद हलामी आदींनी सहकार्य केले.

दोन संस्कृतींचा संगम...

रामायणासह इतर हिंदू ग्रंथांचा अभ्यास केल्यास रावणाबद्दल बरीच माहिती मिळते. मुख्य म्हणजे रावण हा आर्य व अनार्य या दोन संस्कृतीचा संगम होता. रावणाचे वडील विश्रवा हे ऋषी पुलत्स्य यांचे पुत्र होते. ते आर्य असून त्यांनी अनार्य संस्कृतीच्या कैकसीशी विवाह केला. त्यांच्यापासून रावण आणि कुबेर या दोघांचा जन्म झाला. या अर्थाने रावण आर्य, अनार्य संस्कृतीच्या संगमातून जन्माला आला होता. पण, रावणाने आपल्या आईच्या अनार्य संस्कृतीचे अर्थात रक्ष संस्कृतीचे पालन केले. त्यामुळे त्याची प्रतिमा राक्षस अशी करण्यात आली, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे अनेक आदिवासी रावणाला आपला पूर्वज मानतात.
 

पातूर तालुक्यातील सांगोळा येथे राज्यातील एकमेव मंदिर

पातूर ः अवघ्या भारतवर्षात मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू असल्याने राक्षस म्हणून रावणाची हेटाळणी होणे यात काही आश्चर्य नाही, परंतु पातूर तालुक्यातील सांगोळा हे गाव याला अपवाद आहे. रावणाच्या सद्‍गुणांमुळे येथे रावणाची पूजा केली जाते. तब्बल दोनशे वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. ‘वाईट ते सोडावे, चांगले ते घ्यावे’ ही शिकवण आपल्याला सांस्कृतीने दिली आहे. दशानन रावणामध्ये अनेक चांगले गुण होते. या सद्‍गुणांमुळे रावणाची सांगोळ्यात पूजा केली जाते. गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन मूर्ती आहे. हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थान आहे. रावणातील दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील चांगल्या गुणांचे दर्शन होते. तपस्वी, बुद्धिमान, महापराक्रमी, वेदाभ्यासी, एकवचनी या गुणांमुळे सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. येथील रावणाचे मंदिर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील एकमेव असल्याचे बोलले जाते. महापंडित रावणाची नगरी लंका अकोल्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे. तरीसुद्धा अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची नित्यनेमाने पूजा केली जाते. गेल्या दोनशे वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असलेल्या असलेल्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपस्या केली होती. त्यांच्या प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रम होत असत. ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्याचे काम सोपवले गेले, पण त्याच्या हातून घडली ही दशानन रावणाची मूर्ती! दहा तोंडे, काचा बसवलेले वीस डोळे, सर्व आयुध असलेले वीस हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली.  

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravana worshiped in Paraswadi village in Gadchiroli district