जिल्ह्यात पुन्हा निवडणुकीचे वारे 

वीरेंद्रकुमार जोगी
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नागपूर  : विधानसभा निवडणुकीत व्यस्त असलेले नेते निकालानंतर पेंगलेले नाहीत तर त्यांनी आता पुन्हा तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वार वाहू लागले आहेत.

नागपूर  :सर्कलनिहाय स्थानिक इच्छुकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षाकडे दावेदारी करणारे इच्छुक त्यांच्या शक्तीचा परिचय करून देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 
राज्यातील नागपूरसह धुळे, नंदूरबार, अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर येत्या 20 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यानंतर निवडणुका लागतील असे मानले जात आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगानेही तयारी चालविली आहे. नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांत एकूण 58 जिल्हा परिषद सर्कल व 116 पंचायत समिती गणांसाठी इच्छुक जोरादार मोर्चेबांधणी करीत आहेत. 
कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या चार प्रमुख पक्षांसह वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, रिपाइंचे कार्यकर्ते गावागावांत बैठकीवर जोर देत आहेत. कार्यकर्त्यांना एकत्र करून मतदारांना भविष्यकालीन योजनांची माहिती देत आहेत. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीमध्ये वर्चस्व कायम राहावे यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. 

कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण 
विधानसभा निवडणुकीत यावेळी कॉंग्रेसला मिळालेल्या यशामुळे कॉंग्रेसमध्ये उत्साह संचारला असल्याने यावेळीच्या जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता स्थापन करावी यासाठी नवनिर्वाचित आमदारही लक्ष घालत आहेत. याशिवाय ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली त्यांनादेखील आपल्या शक्तीचा परिचय करून देण्याची ही मोठी संधी हाती आली आहे. 

शिवसेना काढणार वचपा 
जिल्ह्यात यावेळी शिवसेनेला एकही जागा मिळाली नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक चांगलीच मनावर घेतली आहे. विशेषत: नरखेड, मौदा, पारशिवनी व रामटेक तालुक्‍यात शिवसैनिक बैठका घेऊन तयारी करीत आहेत. रामटेकमधून अपक्ष निवडून आलेले आशीष जयस्वाल यांचे नेतृत्व शिवसैनिकांनी मान्य केलेले आहे. 

राष्ट्रवादी देणार धक्का 
राष्ट्रवादी कॉंग्रेसला हिंगणा तालुक्‍यात पराजयाचे तोंड पाहावे लागले आहे. मात्र असे असतानाही राष्ट्रवादीचा जनाधार कमी झालेला नाही हे दाखविण्याची संधी मिळणार आहे. काटोल तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनिल देशमुखांच्या विजयाने बळ मिळाले आहे. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस उमरेड व मौदा तालुक्‍यात जनाधार शोधण्याच्या प्रयत्नात आहे. 

भाजपची विशेष व्यूहरचना 
विधानसभा निवडणुकीत जरी भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी देखील भाजप कार्यकर्ते निराश झालेले नाहीत. कामठी, सावनेर, काटोल, हिंगणा व उमरेड या महत्त्वाच्या तालुक्‍यात भाजपने मुसंडी मारण्याची योजना आखली आहे. कोणत्याही परिस्थितीत या तालुक्‍यात विरोधी पक्षाला वरचढ होऊ देऊ अशी व्यूहरचना भाजपने केल्याचे कार्यकर्त्यांच्या देहबोलीतून जाणविते. 

या नेत्यांकडे राहणार लक्ष 
जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे कॉंग्रेसचे मनोहर कुंभारे, मनोज तितरमारे, बाबा आष्टकर, शांता कुमरे, नाना कंभाले, तापेश्‍वर वैद्य, शिवसेनेचे राजेंद्र हरणे, देवेंद्र गोडबोले, शरद डोनेकर, भाजपचे उकेश चौहाण, संदीप सरोदे, संध्या गोतमारे, निशा सावरकर, राष्ट्रवादीचे चंद्रशेखर चिखले, उज्ज्वला बोढारे, रिपाइंचे दीपक गेडाम यांच्याकडे या निवडणुकीत विशेष लक्ष राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Re-election winds in the district