
खुर्सापार जंगलात वाघाचे वास्तव्य असल्याची माहिती रोपवन संरक्षक मजूर शेषराव कैकाडी यांनी दिली. मोहगाव शिवणफळ जंगलालगतच्या आर्वी शिवारात सोमवारी (ता. २८) सायंकाळी ६ वाजता वाघाने डरकाळ्या फोडल्याने शेतशिवारातून नागरिक भयभीत होऊन गावाकडे पळत सुटले.
गिरड (जि. वर्धा) : समुद्रपूर तालुक्यात सध्या तीन वाघांनी खेड्याकडे आगेकूच केल्याने शेतशिवारात भीतीचे वातावरण आहे. हे वाघ वेगवेगळ्या परिसरात भ्रमंती करीत आहे. गावांच्या वेशीवर डरकाळ्या फोडून आपल्या अस्तित्वाची प्रचिती देत आहेत. मात्र, याविषयी वनविभाग अनभिज्ञ आहे.
गिरड आणि मंगरूळ सहवन परिक्षेत्रातील जंगलात तीन वाघांसह बिबट्याचे वास्तव्य आहे. सध्या या वाघांनी गावाकडे मोर्चा वळविला असून, नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहगाव शिवणफळ जंगलाच्या वेशीवर एका वाघासह बिबट्याचे अधूनमधून नागरिकांना दर्शन होत आहे. रविवारी गिरड सहवन परिक्षेत्रातील खापरी नाला परिसरात शेतात बांधून असलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला. यात एक गाय जखमी झाली.
हा वाघ खापरी, उंदीरगाव, अंतरगाव परिसरातील पोथरा नदीच्या काठाने वास्तव्यास आहे. नंदोरी जवळच्या नारायणपूर परिसरात दुसऱ्या वाघाने एका कालवडीवर हल्ला केला. तालुक्यातील नंदोरी भागात पोथरा नदीच्या आडोश्याने वाघाचे वास्तव आहे. या वाघाने चंद्रपूर जिल्ह्यातून शिरकाव केल्याची प्राथमिक माहिती आहे.
खुर्सापार जंगलात वाघाचे वास्तव्य असल्याची माहिती रोपवन संरक्षक मजूर शेषराव कैकाडी यांनी दिली. मोहगाव शिवणफळ जंगलालगतच्या आर्वी शिवारात सोमवारी (ता. २८) सायंकाळी ६ वाजता वाघाने डरकाळ्या फोडल्याने शेतशिवारातून नागरिक भयभीत होऊन गावाकडे पळत सुटले. या वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डोंगर काठावर वसलेल्या गावात आता वाघाचे दर्शन नेहमी घडत आहे. लादगड येथील प्रवीण घोडे यांच्या जर्सी गायीवर वाघाने हल्ला करून फडशा पाडला. तर दोन म्हशी जखमी केल्या. तसेच सुसूंद येथील शेतकरी विजय चौधरी यांच्या एका बैलाची वाघाने शिकार केली. पहाडावरील नदी-नाले आटले. परिणामी जंगली प्राणी पाण्याच्या शोधात पायथ्याशी येऊ लागले. वनविभागाने पहाडी भागावर लवकरात लवकर पाण्याची सोय करावी. अन्यथा वाघासारख्या हिंस्त्र प्राण्यांचा गावाशेजारी वावर वाढेल, असा संशय व्यक्त केला आहे.
नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
पोथरा नदी पात्राच्या कडेला वाघाचे वास्तव
समुद्रपूर तालुक्याला नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलाची हद्द लागून असल्याने नियमित वाघांची ये-जा असते. या वाघांना पोषक वातावरण मिळाल्यास ते स्थानिक जंगलात स्थिरावतात. अन्यथा आलेल्या मार्गाने परत जातात. सध्या चंद्रपूर-वर्धा जिल्ह्यातील हद्दीलगत पोथरा नदीच्या पात्राच्या कडेला या वाघाचे वास्तव आहे. आमची त्यावर पाळत आहे.
- वैशाली बारेकर,
वनपरिक्षेत्र अधिकारी, समुद्रपूर
संपादन - नीलेश डाखोरे