
पोलिस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
यवतमाळ : राज्यात पोलिस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. आधी लेखी परीक्षा की शारीरिक चाचणी, असा संभ्रम पोलिस भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांत निर्माण झाला. पहिल्या टप्प्यात आधी लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर, पोलिस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
नक्की वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल...
यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी गुरुवारी (ता.21) रात्री पोलिस दलाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. पोलिस दलात 12 हजार 500 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. त्यासाठी मागील काही वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी मैदानात घाम गाळत आहे. 2019 मध्ये निघालेल्या जाहिरातीत आधी लेखी परीक्षा व नंतर शारीरिक चाचणी घेण्याचा निर्णय झाला होता.
आतापर्यंत पोलिस भरतीच्या सुरुवातीला आधी शारीरिक चाचणी होत होती. आधी लेखी परीक्षा घेणे म्हणजे उमेदवारांवर अन्याय करण्यासारखे आहे, असा सूर उमटला. यात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडतील, अशी पुष्टी जोडण्यात येत होती. पाच हजार पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया 2019च्या अटींप्रमाणे घेण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात जवळपास आठ हजार जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. त्यात मात्र आधी शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. गृहमंत्री देशमुख यांच्या स्पष्टीकरणामुळे उमेदवारांतील संभ्रम दूर झाला आहे.
नक्की वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या...
पोलिस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी 12 हजार 500 जागांसाठी दोन टप्प्यात भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. 2019मधील भरतीच्या अटींत कोणताच बदल होणार नाही. दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा असा निर्णय घेण्यात आला आहे.
- अनिल देशमुख
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.
संपादन - अथर्व महांकाळ