बांगलादेशमधील संत्रा निर्यातीला ‘रेड सिग्नल’; अनिश्चित काळासाठी लांबणीवर

Red signal to orange exports to Bangladesh
Red signal to orange exports to Bangladesh

नागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये रेल्वेने होणारी प्रस्तावित संत्रा निर्यात अडचणीत आली आहे. नाशवंत शेतमाल उतरविण्यासाठीच्या सुविधांचा बेनापोल स्थानकावर अभाव असल्यामुळे ही निर्यात अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे.

रेल्वेच्या माध्यमातून स्वस्त आणि कमी वेळात शेतमाल वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्याच प्रयत्नामुळे शेतमाल वाहतुकीवरील ५० टक्के अनुदान आता थेट दिले जाणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च देखील निम्म्यावर आला आहे. शेतकऱ्यांनी देखील याला प्रतिसाद देत वीस पार्सल व्हॕनच्या माध्यमातून ४६० टन संत्रा बांगलादेशला निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

तब्बल अकरा वर्षांनंतर अमरावती जिल्ह्याच्या संत्रनगरी वरूड रेल्वेस्थानकावरून ही निर्यात होणार होती. श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीसह वरूड भागातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांचा संत्रा रेल्वेने बांगलादेशला पाठविण्यात येणार होता. मंगळवार त्यासाठी निश्चित करण्यात आला होता. परंतु, वरूड रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेल्या तात्पुरता मालधक्का क्षतिग्रस्त झाला. त्यामुळे मंगळवारी ऐवजी शनिवारी संत्रा स्पेशलगाडी मार्गस्थ करण्याचे ठरले.

दरम्यान, बांगलादेशमधील बेनापोल स्थानकावर एकावेळी चारच पार्सल व्हॕन रिकामी करता येतात अशी माहिती समोर आली. एक पार्सल व्हॕन खाली करण्यासाठी साधारणतः तीन तासांचा वेळ लागतो. रेल्वेच्या नियमानुसार पार्सल व्हॅनमध्ये मारणे आणि उतरविणे यासाठी सात तासांचा कालावधी दिला जातो.

त्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाते. त्यातच संत्रा फळ नाशवंत असल्याने माल चढविणे आणि उतरविणे तसेच तीस तास वाहतूक असा बराच वेळ जातो. परिणामी संत्रा खराब होण्याची भीती आहे. या कारणामुळे संत्र्याची रेल्वेच्या माध्यमातून बांगलादेशपर्यंतची निर्यात अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली.

दिल्लीपर्यंत संत्रा नियमित पाठविला जातो
सुरुवातीला मंगळवारी (२० ऑक्टोंबर) त्यानंतर शनिवारी (२५ ऑक्टोंबर) बांगलादेशला संत्रा पाठवविण्याचे ठरले होते. परंतु, आता तांत्रिक अडचणीमुळे ही निर्यात लांबणीवर पडली आहे. किसान रेल्वेच्या माध्यमातून दर बुधवारी दिल्लीपर्यंत संत्रा नियमित पाठविला जात आहे.
- रमेश जिचकार,
कार्यकारी संचालक, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी, वरूड, अमरावती

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com