का हरवताहेत लाल मखमली मृगाचे किडे?

मिलिंद उमरे
Tuesday, 16 June 2020

हिरव्यागार जमिनीवर गर्द लाल मृगकिडे दिसायचे. जणू हिरव्या कोंदणात तेजस्वी माणिक जडवल्याप्रमाणे तेव्हा जमिनीला शोभा यायची. हे मृगकिडे नसून वसुंधरेचा सुंदर अलंकार आहेत, असे वाटायचे.

गडचिरोली : सत्तावीस नक्षत्रांमध्ये अतिशय देखण्या मानल्या जाणाऱ्या मृगनक्षत्रात सूर्याचा प्रवेश झाला की, सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागतात. कारण मृगनक्षत्रातील पावसाच्या अलवार मृगधारा जमिनीवर कोसळणार असतात. माणसाचं जसं या नक्षत्राशी घट्ट नातं आहे, तसच एका किटकाचंही आहे. किंबहुना हा कीटक आणि मृगनक्षत्र हे एक अद्वैतच असल्यामुळे फक्त या नक्षत्राच्या काळातच दिसणाऱ्या किड्यांना मृगकिडे म्हणतात. पण, आता हे मृगकिडे हरवत चालले असून ग्रामीण भागातच काही प्रमाणात त्यांचे अस्तित्व दिसून येत आहे.

पूर्वी रोहिणी नक्षत्राची वीज, वादळांची ललकारी संपली की, पाऊसधारा घेऊन मृगनक्षत्र यायचे. मृगाचा पाऊस पडताच सारी जमिनी हिरवीगार व्हायची. या हिरव्यागार जमिनीवर गर्द लाल मृगकिडे दिसायचे. जणू हिरव्या कोंदणात तेजस्वी माणिक जडवल्याप्रमाणे तेव्हा जमिनीला शोभा यायची. हे मृगकिडे नसून वसुंधरेचा सुंदर अलंकार आहेत, असे वाटायचे. बालकांसाठी हे कीटक अधिकच उत्सुकतेचा विषय असायचे. या किड्यांना पकडून डबीत ठेवणे, त्यांना गवतात फिरवणे, त्यांच्या हालचाली निरखणे, खडूने पांढरी रेष काढून या किड्यांच्या शर्यती लावणे, अशा अनेक खेळांसाठी बालकांना हा कीटक हवा असायचा.

फक्त काही दिवसांसाठी दिसणारा हा किडा वर्षभराच्या आठवणी बालमनात साठवून जायचा. मृगनक्षत्राच्या काळातच या किटकाचा प्रजनन काळ असल्याने काही दिवसांसाठी तो मादीला आकृष्ट करण्याकरिता जमिनीवर येतो. पहिल्या पावसानंतर केवळ तीन आठवडे जमिनीवर राहून नंतर वर्षभरासाठी अदृश्‍य होतो. या किड्याचं जीवनचक्र फार कमी कालावधीचं असते. साधारणपणे दोन ते तीन महिन्यानंतर हे किडे दिसत नाहीत. या किड्यांची मादी ओल्या मातीत अंडी देते आणि साधारणपणे दोन महिन्यांनंतर या अंड्यांमधून लहानलहान किडे बाहेर पडतात. त्यातील लहान वयाचे किडे हे वयस्क किड्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांची अन्न भक्षण करण्याची पद्धतदेखील इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. हे किडे एखादा लहानसा जीव जंतू शोधतात आणि त्यानंतर त्याला मधोमध दंश करून त्याच्या शरीरातले रक्त पिण्यास सुरुवात करतात. ही सर्व प्रक्रिया चालू असताना त्यांच्या तावडीतील किडा थोडीफार हालचाल करतो. परंतु मृगाच्या बाळकिड्याच्या मजबूत पकडीमुळे तो किडा स्वतःचा जीव वाचवू शकत नाहीत.
या किड्यांना साधारणपणे आठ पाय असतात. परंतु जोपर्यंत हे किडे तरुण होत नाहीत तोपर्यंत त्यांना सहा पायच असतात. पुढे तरुण झाल्यानंतर त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांसोबत हे जास्तीचे दोन पायदेखील दिसू लागतात. काही शारीरिक समस्यांवर औषध म्हणून हे किडे वापरले जातात, त्यामुळेही त्यांची संख्या कमी होत आहे. शिवाय वाढते औद्योगिकरण, प्रदूषण, शेतामध्ये अतिरिक्त रसायनांचा वापर यामुळे हे कीटक आता हरवत चालल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा - घरफोडीतील पाच लाखांसाठी सनीचा गेम

विलक्षण नावे....
हा मृग कीटक जेवढा विलक्षण आहे तेवढीच त्याची विविध भाषांतील नावेसुद्धा विलक्षण आहेत. मराठीत सर्वसाधारणपणे याला मृगाचा किडा किंवा मृगकिटक तसेच शरीरावर मऊ केसांची झालर असल्याने मखमली कीटकही म्हणतात. बोलीभाषेत लालसर भगव्या रंगामुळे गोसावी, बोवा, ही नावं आहेत. तेलुगूत आरुद्रा (नक्षत्र) पुरुगू, संस्कृतमध्ये बिरबाहुती, तर उर्दूत राणी किडा म्हणतात. इंग्रजीत रेड व्हेल्वेट माइट आणि शास्त्रीय भाषेत होलोस्ट्रिक या नावाने हा ओळखला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red velvet are missing now