पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी चक्क उपमुख्यमंत्र्यालाच फटाकारले!

संजय डाफ
Thursday, 28 January 2021

मोठ्या संकटातून आपले राज्य बाहेर आले आहे. कोरोनाचा लढा येवढा सोपा नव्हता. कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. कोरोना हद्दपार झाला नाही.

नागपूर : प्रांतीय भाषांनुसार राज्याच्या रचना करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि कर्नाटकचा काय संबंध, येवढही ज्याला कळत नाही, असा माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री असेल तर त्या राज्याची कीव करावीशी वाटते. अशा उपमुख्यमंत्र्याला वेड्यांच्या रुग्णालयात भरती करा, असे म्हणत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना फटकारले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ‘बेळगाव सोडा, मुंबईसुद्धा कर्नाटकचा भाग आहे’ असे वक्तव्य केले होते. यावर वडेट्टीवार यांनी संपात व्यक्त केला. बेळगावच्या लोकांची इच्छा मराठी राज्यात येण्याची असेल तर त्यांना येऊ दिले पाहिजे. शेवटी आपल्या या राज्यासाठी १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले आहे.

नक्की वाचा - ...अन् पंचेचाळीस वर्षीय इसम कोर्ट परिसरातून आरडा-ओरड करीत बाहेर पडला

त्याचा अभिमान बेळगाववासीयांना आहे. त्या मराठी लोकांच्या भावनांचा विचार करून केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये मध्यस्थी करून बेळगावला महाराष्ट्रात सामील केले पाहिजे आणि त्या वेड्या उपमुख्यमंत्र्याचाही बंदोबस्त तत्काळ केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मोठ्या संकटातून आपले राज्य बाहेर आले आहे. कोरोनाचा लढा येवढा सोपा नव्हता. कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. कोरोना हद्दपार झाला नाही. अर्थसंकल्पामध्ये राज्याला मदत मिळाली पाहिजे. केंद्र सरकारच्या महाराष्ट्राविषयीच्या भावना शुद्ध नाहीत. आमच्या अपेक्षा खूप आहेत. त्या केंद्राने पूर्ण केल्या पाहिजे, असे अर्थसंकल्पाबाबत वडेट्टीवार म्हणाले.

भरीव तरतुदीचा अर्थसंकल्प सादर करावा

कोरोनाच्या स्थितीमुळे महसूल गोळा झालेला नाही. जवळपास एक लाख कोटी रुपयांची तूट आहे. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने या बाबी लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतुदीचा समावेश असलेला अर्थसंकल्प सादर करावा, अशी अपेक्षा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rehabilitation Minister Vijay Vadettiwar slammed the Deputy Chief Minister political news