प्रेमीयुगुलाच्या लग्नात नातेवाईकांची एंट्री; प्रकरण पोहोचले पोलिस ठाण्यात

आनंद चिठोरे
Friday, 20 November 2020

लग्नामध्ये ऐनवेळी वाद निर्माण झाल्याचे बघून अनेकांनी येथे गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी प्रेमीयुगुलासह विरोध करणाऱ्यांनाही पोलिस ठाण्यात नेले.

पथ्रोट (जि. अमरावती) : प्रेमीयुगुलाच्या लग्नात मुलीच्या नातेवाईकांनी ऐनवेळी येऊन वाद घातल्याने प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. परंतु, या घटनेमुळे ग्रामस्थांचे चांगलेच मनोरंजन झाले. ही घटना विवाह लावण्याच्या अधिकृत ठिकाणी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचलपूर तालुक्‍यातील एका गावातील तरुण-तरुणी परस्परांच्या प्रेमात पडल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नासाठी ते दोघे थेट पथ्रोट येथे पोहोचले. परंतु, प्रेमीयुगुलांपाठोपाठच मुलीकडच्या नातेवाईकांनी दोघांना विवाहाच्या ठिकाणीच गाठले. त्यांनी लग्नाला प्रचंड विरोध केल्याने एकच गोंधळ उडाला.

जाणून घ्या - ‘पदवीधर’ची धुरा सांभाळणारे नगरसेवक अपदवीधर! ३४ पैकी फक्त सहा जण बजावू शकणार मतदानाचा हक्क

मुलगी मागील काही वर्षांपासून आपल्या नातेवाईकांकडे राहते. काही दिवसांपासून तिचे एका युवकासोबत सूत जुळले. त्यातून दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मुलीच्या आई-वडिलांना लग्नाबाबत काहीच माहिती नव्हती. तिच्या पालनपोषणाची जबाबदारी ही मामाकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये तिने आपल्या आई-वडिलांकडे जाऊन हवा तसा निर्णय घ्यावा, अशी इच्छा मुलीच्या मामांनी तिच्याकडे व्यक्त केली.

तिची समजूत काढण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. परंतु, ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने परिस्थिती चिघळली. त्यामुळे विवाहाच्या ठिकाणीच वाद वाढला. लग्नामध्ये ऐनवेळी वाद निर्माण झाल्याचे बघून अनेकांनी येथे गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी प्रेमीयुगुलासह विरोध करणाऱ्यांनाही पोलिस ठाण्यात नेले.

हेही वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय

वयाचे पुरावे नसल्याने लग्न लावण्यास नकार
युवक व युवती लग्नासाठी आले होते. परंतु, त्यांच्याकडे वयाचे पुरावे नसल्याने लग्न लावण्यास नकार दिला.
- शरद कोसरे,
प्रधान, आर्य समाज मंदिर पथ्रोट

मुलगा, मुलगी सज्ञान
मुलगा व मुलगी दोघेही सज्ञान आहेत. त्यामुळे कायद्यानुसार त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तसे त्यांचे बयाण नोंदविले आहे.
- नरेंद्र डांबाळे, ठाणेदार

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relatives oppose the marriage of lovers