अटी, शर्थींचे पालन करत उघडण्यात आली गडचिरोलीची बाजारपेठ

gadchiroli market
gadchiroli market

गडचिरोली : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने सुरू झालेल्या संचारबंदीमुळे कुलूपबंद असलेली बहुतांश दुकाने शनिवारी (ता. 9) जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या निर्देशानुसार काही नियमांचे पालन करत उघडण्यात आली. त्यामुळे बर्‍याच दिवसांनी शहरातील बाजारपेठ बहरलेल्याचे सुखद चित्र दिसून आले. तरीही बाजारात ग्राहकांची संख्या कमी असून फिजीकल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात येत आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात अजूनपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे गडचिरोलीचा ग्रीन जिल्ह्यात समावेश असून जिल्ह्यातील संचारबंदीमध्ये काही प्रमाणात सूट देवून काही व्यवसाय व दुकाने सुरू  करण्याबाबतचे नवे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत. मात्र सूट दिलेल्या ठिकाणी कोरोना संसर्ग न होण्याकरिता आवश्यक खबरदारी व प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे नागरिक तसेच दुकानदारांना बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी सिंगला यांनी म्हटले आहे. 

4 मे रोजीनुसार 17 मेपर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यामध्ये 9 मेपासून विविध व्यवसाय व दुकाने सकाळी 7 वाजतापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच सूट म्हणजे जमाव व गर्दी करण्यासाठी नसून आदेशामध्ये नमूद खबरदारी न घेता गर्दी केलेल्या ठिकाणी संबंधित दुकानदार व नागरिक जबाबदार असणार आहेत. अशा लोकांवर व दुकानमालकावर कोविड - 19 साथरोगअंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करून संबंधित दुकान सील करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत.

यावर राहील बंदी...

1. जिल्ह्यात इतर राज्यातून व इतर जिल्ह्यातून विनापरवाना प्रवेश करता येणार नाही. बाहेर जाण्यासही परवानगी आवश्यक.

2. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण देणार्‍या संस्था बंद राहतील. (ऑनलाइन पद्धतीने डिस्टन्स लर्निंग वगळून)

3. कँटीन (आतिथ्य) सेवा बंद (पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अटीवर छोटे उपाहारगृह, स्वीट मार्ट, फरसाण सेंटर व चहा- नाश्ता सेंटर सुरू ठेवता येईल. बसण्याच्या व्यवस्थेला परवानगी नाही.)

4. सर्व चित्रपटगृहे, मॉल्स, खरेदी संकुले, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे, सभागृहे.

5. निवासाची सोय असलेले हॉटेल्स, लॉज, खासगी विश्रामगृह.

6. सर्व सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन /शैक्षणिक /सांस्कृतिक /धार्मिक आदी विषयक कार्यक्रम.

7. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे नागरिकांकरिता बंद राहतील.

8. पानटपरी, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने.

9. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई.

10. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क/रुमाल न घालता फिरणे.

11. आठवडी बाजार बंद राहील.

12. विवाह कार्यक्रमास कमाल 50 लोकांच्या मर्यादेपेक्षा मोठ्या कार्यक्रमास बंदी.

13. अंत्यसंस्काराच्या बाबतीत वीसपेक्षा जास्त लोकांच्या जमावास बंदी.

14. प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई.

15. रात्री 7 ते सकाळी 7 या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर निघण्यास नागरिकांना मज्जाव.


हे राहील सुरू....

1. प्रतिबंधित दुकाने व व्यवसाय सोडून इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू  राहतील.

2. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अखत्यारीतील 50 टक्के बस डेपो प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी.

3. पेट्रोलपंप, घरगुती गॅस, तेल कंपन्या, त्यांचे भांडार आदी संबंधित वाहतूक व त्यासंबंधित कार्यवाही ज्यामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी आदीचा समावेश असेल.

4. डिझेल-पेट्रोलची विक्री /खरेदीसाठी तहसीलदारांकडून परवाना (पासेस) ची आवश्यकता असणार नाही.

5. जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे प्रकल्प व त्यांना वेळेचे बंधन लागू राहणार नाही.

6. ई-कॉमर्स सेवा जसे अ‍ॅमेझॉन, स्नॅपडिल वगैरे यांना कुरिअर पार्सल घरपोच वितरित करता येईल.

7. ऑटो रिक्षा व सायकल रिक्षामध्ये 1 चालक व2 प्रवासी याप्रमाणे वाहतूक सेवा सुरू होईल.

8. केश कर्तनालयात एकावेळी एकाच ग्राहकास प्रवेश, कारागिराने स्वत: चेहर्‍यावर रुमाल, मास्क वापरावे. 

ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे. वारंवार एकच कापड वापरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

9. सर्व शासकीय विभागातील 100 टक्के कर्मचार्‍यांसह आवश्यक निर्देशांचे पालन करून कार्यालयात उपस्थिती अनिवार्य.

..तर ठोकणार सील
संचारबंदी संदर्भात काही सर्वसाधारण सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे सर्वांना बंधनकारक राहील. शिवाय मास्क, रुमाल बांधून असलेल्या ग्राहकांनाच केवळ दुकानात एका वेळेस कमाल 5 व्यक्तींना (तीन फूट अंतर ठेवून) मर्यादेत प्रवेश द्यावा. दुकानामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असेल. या नियमांचे पालन न केल्यास दुकान सील करण्यात येईल. नागरिकांची घराबाहेर हालचाल होऊ नये याकरिता दुकानदारांनी घरपोच सेवा पुरविण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, पॅथॉलॉजी सेंटर, सोनोग्राफी सेंटर, औषधी विक्रेते, केमिस्ट यांना वेळेचे बंधन राहणार नाही. वय 65 वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती, 10 वर्षांखालील मुले, गर्भवती माता आदींनी शक्यतो घरीच थांबावे. अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com