रोजगारासाठी पुन्हा स्थलांतर; होळी आटोपताच कामाच्या शोधात रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगारासाठी पुन्हा स्थलांतर; होळी आटोपताच कामाच्या शोधात रवाना

रोजगारासाठी पुन्हा स्थलांतर; होळी आटोपताच कामाच्या शोधात रवाना

धारणी : होळीच्या सणामुळे गेल्या १५ दिवसांपासून मेळघाटच्या प्रत्येक गावात आलेली रंगत आता परत एकदा ओसरण्यास सुरुवात झाली आहे. रोजगाराच्या शोधात येथील आदिवासी बांधवांचे स्थलांतर सुरू झाले आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर कधी रोजगाराची हमी दिल्या जाणार, असा सवाल करण्यात येत आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे.

मेळघाटातील नागरिक रोजगारासाठी स्थलांतर करीत असल्याने गावागावातील गल्ल्यांमध्ये पुन्हा शांतता निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. होळीमुळे गावे चकाचक दिसू लागली होती. प्रत्येक गावात तसेच तालुक्यातील बाजारपेठांमध्येही आनंदाचे वातावरण होते, मात्र होळी होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच पुन्हा मजूरवर्गाचे स्थलांतर सुरू झाले आहे, ही चिंतेची बाब आहे.

मेळघाटातून मजूरवर्ग पुणे, अकोला, अकोट, राजस्थान, कर्नाटक, हैदराबाद, परतवाडा, नागपूर येथे रोजगारासाठी जाताना दिसत आहे. कामानिमित्त बाहेर जात असताना अनेक ठिकाणी अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे अनेक मजुरांना आपला जीव गमवावा लागला. तरीही मजूर रोजगारासाठी स्थलांतर करताना दिसत आहेत.

मेळघाटात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये गावातील नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे, मात्र अनेक ठिकाणी कामे नसल्याने ही योजना बंद पडल्याने गावातील नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे गावातील रस्ते ओसाड पडलेले दिसत आहेत. रोजगार हमी योजनेत २४८ रुपये प्रतिदिन या दराने रोजगार उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. परंतु वेळेवर रोजगार हमी योजनेचे पैसे मिळत नसल्याने अनेक वेळा लोक या योजनेच्या कामावर जाण्याचे टाळतात व दुसऱ्या शहराकडे स्थलांतर करतात.

रोहयोत शेतीच्या कामांची तरतूद करा

रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीची कामे झाली पाहिजेत, ज्यातून चांगला रोजगार मिळू शकतो. पीकपेरणीपासून ते काढणीपर्यंत, रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची कामे घेतल्यास स्थलांतराच्या समस्येवर मात करता येते. स्थलांतरामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने प्रचंड त्रास होतो. रोजगार योजनेत शेतीची कामे घेतल्यास शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि गावातील नागरिकांनाही रोजगार मिळेल.

Web Title: Relocation For Employment After Holi Search Of Work

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..