वीस वर्षांनंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह; पत्नीने केला होता दुसरा विवाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीस वर्षांनंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह; पत्नीने केला होता दुसरा विवाह

वीस वर्षांनंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह; पत्नीने केला होता दुसरा विवाह

वनोजाबाग (जि. अमरावती) : वीस वर्षांपूर्वी लग्न झाले. सात वर्षांच्या संसारानंतर दोघांत खटके उडायला लागले. दोघेही वेगळे झालेत. तिने दुसरा विवाह केला. तो मात्र तसाच राहिला. काही काळातच तिचा दुसरा संसारही तुटला. नंतर मात्र ती माहेरी राहू लागली. इकडे त्याला संसार परत जुळावा, असे वाटत होते. परत तो तिच्या माहेरी आला व आई-वडिलांना तिचा हात मागितला. अखेर वीस वर्षांनंतर त्याने परत तिच्याशीच पुन्हा थाटात विवाह केला.

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) तालुक्यातील मुऱ्हा येथील श्यामराव मोरे यांची मुलगी सुगंधाचा विवाह वीस वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यातील लाखपुरी (ता. मूर्तिजापूर) येथील संतोष जामनिक यांच्याशी झाला होता. सात वर्षे संसार सुरळीत चालला. परंतु त्यानंतर दोघांमध्ये वारंवार खटके उडणे सुरू झाले. त्यामुळे सुगंधा पतीला सोडून माहेरी आली. नंतर दोन वर्षानी सुगंधाचे दुसरीकडे लग्नही झाले, पण तेही टिकले नाही. त्यामुळे सुगंधा परत माहेरी निघून आली.

हेही वाचा: नवीन फोन खरेदी करताय? मग या गोष्टींकडे द्या लक्ष

त्यानंतर सुगंधा आई-वडिलांकडे राहू लागली व शेतीचे कामे करून उपजीविका भागवित होती. सुगंधाला अपत्य नाही, तर दुसरीकडे सुगंधाचा पहिला पती संतोष जामनिक याने दुसरा संसार थाटला नव्हता. वीस वर्षांनंतर संतोष सुगंधाच्या आई-वडिलांच्या भेटीसाठी आला, त्याने सुगंधा सोबत पुनर्विवाह करण्याची इच्छा त्यांच्याकडे बोलून दाखविली.

आता वाद होणार नाही, असेही वचन त्याने त्यांना दिले. त्यामुळे सुगंधासह तिच्या आईवडिलांनी या पुनर्विवाहाला होकार दिला. हा पुनर्विवाह शनिवारी सायंकाळी मुऱ्हा येथील बुद्धविहारात पार पडला. यावेळी आशीर्वाद देण्यासाठी गावातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते. या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे.