पालकमंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळण्याची मागणी

सुधीर भारती
Saturday, 17 October 2020

आपले कर्तव्य बजाविणाऱ्या एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

अमरावती : आपले कर्तव्य बजाविणाऱ्या एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्या राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी सांगितले, पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले, भाजपच्या नावाने पालकमंत्री शिमगा करीत आहेत, मात्र वास्तविक न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.

वाचा - बच्चू कडूंचा इंग्रजी शाळांना वऱ्हाडी झटका; खोटी माहिती दिल्यास गुन्हा नोंदविणार

 

न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आल्याने ज्या महिला व बालकल्याण विभागाच्या त्या मंत्री आहेत त्या विभागाला आता त्या कशापद्धतीने न्याय देवू शकतील, अशा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यशोमती ठाकूर यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी सुद्धा पालकमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. पत्रपरिषदेला संध्या टिकले, मीना पाठक, दीपक खताडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आम्ही भाजपच्या विचारधारेविरोधात लढत आहोत. भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांच्या मागील पाच वर्षांतील कारनाम्याबाबत बोलावे, जलयुक्त शिवार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. भाजपविरोधातील वैचारिक लढा सुरूच राहील.
- यशोमती ठाकूर, महिला व बालकल्याण मंत्री.  

संपादन - नरेश शेळके

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove Guardian Minister of Amravati from state cabinet