नोकरी देण्यापूर्वीच मागितले राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 October 2019

नागपूर : शहरातील घराघरातून कचरा गोळा करण्यासाठी दोन नव्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. या कंपन्या नोकरी देण्यापूर्वीच राजीनाम्यावर स्वाक्षरी घेत असल्याने इच्छुक उमेदवारांत रोष पसरला आहे. कनक रिसोर्सेस कंपनीचे कंत्राट संपुष्टात आल्याने यातील कर्मचाऱ्यांनी या दोन नव्या कंपन्यांकडे नोकरीसाठी धाव घेतली. मात्र, राजीनामा न देणाऱ्यांना कंपनीने प्रतीक्षायादीत टाकल्याचे चित्र आहे. 

शहरातील घराघरातून कचरा गोळा करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनीचा कंत्राट संपुष्टात आला. त्यापूर्वीच महापालिकेने दोन नव्या कंपन्यांना घराघरातून कचरा उचलण्याचे कंत्राट दिले. झोन क्रमांक एक ते पाचमधील घरांतून कचरा उचलण्याचे कंत्राट ए. जी. एन्व्हायरो प्रायव्हेट लिमिटेडला तर झोन क्रमांक सहा ते दहामधील घरांचा कचरा गोळा करण्याचे कंत्राट बीव्हीजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्यांकडे कनकमधून बेरोजगार होणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरीसाठी अर्ज केला आहे. 'कनक'कडे गेली पंधरा वर्षांपासून घराघरातून कचरा उचल करणारे 1700 कर्मचारी आहेत. हे सर्व या दोन्ही कंपन्यांकडे नोकरीसाठी फेऱ्या मारत आहे. परंतु या कंपन्यांनी नोकरीवर घेण्यापूर्वीच इच्छुकांना राजीनामे मागितल्याचे असंघटित कामगार कॉंग्रेसचे लोकेश मेश्राम यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. ए. जी. एन्व्हायरो कंपनी असे राजीनामे लिहून घेत आहे. नोकरीसाठी काही इच्छुक उमेदवार राजीनामे लिहून देत आहे. परंतु ही अट अन्यायकारक असल्याचे नमूद करीत यावर तोडगा काढावा, अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे. याशिवाय या दोन्ही कंपन्यांचे कार्यालयाचा पत्ताही अनेक इच्छुकांना माहीत नाही. त्यामुळे त्यांना संपर्कासाठी समस्या निर्माण होत असल्याचेही मेश्राम यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना सांगितले. 
बेरोजगारीचे संकट 
50 वर्षे वय झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास दोन्ही कंपन्यांनी नकार दिला असल्याचे असंघटित कामगार संघटनेचे कार्यकर्ते लोकेश मेश्राम यांनी नमूद केले. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी काम करीत असून त्यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याबाबत मेश्राम यांनी मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: resignation, appointment, nmc